esakal | बारदाना शिवणारा निघाला व्यापाऱ्याचा अपहरणकर्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

जालना : अपहरण प्रकरणातील संशयितांना घेऊन जाताना पोलिस निरीक्षक राजेद्रसिंह गौर व इतर. 

शहरातील ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे ता. 30 डिसेंबर रोजी पन्नास लाखांच्या खंडणीसाठी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अपहरण झाले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीचे दोन लाख रुपयांसह अपहरण झालेल्या खेराजभाई भानुशाली यांची सुखरूप सुटका केली होती; मात्र या गडबडीत अपहरणकर्ते पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते.

बारदाना शिवणारा निघाला व्यापाऱ्याचा अपहरणकर्ता 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना -  शहरातील ज्येष्ठ व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. तर एक संशयिताचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्याचा जुना बारदाना शिवण्याचे काम करणारा एकजण अपहरणाचा सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे; तसेच दोन वेळा प्रयत्न फसल्यानंतर तिसऱ्या वेळी अपहरणाचा डाव या संशयितांनी साधल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

शहरातील ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे ता. 30 डिसेंबर रोजी पन्नास लाखांच्या खंडणीसाठी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अपहरण झाले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीचे दोन लाख रुपयांसह अपहरण झालेल्या खेराजभाई भानुशाली यांची सुखरूप सुटका केली होती; मात्र या गडबडीत अपहरणकर्ते पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते.

हेही वाचा : जालना झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असताना काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात ही घेण्यात आले होते; तसेच अपहरण झालेल्या परिसरासह त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणीही पोलिसांकडून करण्यात आली. होती. दरम्यान, पोलिसांना एका संशयिताची टीप मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी आपल्या पथकासह कन्हैयानगर येथून मुख्य संशयित राहुल सुदाम जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर नांदेडसह इतर ठिकाणांवरून भरत दशरथ भागडे (वय 21, रा. लालबाग, जालना), अजय ऊर्फ गट्टू इंदर जांगडे (वय 23, रा. कन्हैयानगर, जालना) या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. या प्रकरणातील एक संशयित फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील कार आणि गुप्ती यापूर्वीच पोलिसांनी जप्त केली आहे. 
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, हिरामण फलटणकर, विनोद गडदे, अंबादास साबळे, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, सोमनाथ उबाळे, संदीप मांटे, विलास चेके, किरण मोरे यांनी केली. 

हेही वाचा : वयोवृद्ध जन्मदात्यांवर लेकाचे कुऱ्हाडीने वार 

गाडीत सुरू होता प्रवास 
अपहरणकर्त्यांनी ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना बदनापूर, देऊळगावराजा रोड, अंबड रोडवर सतत कारमध्ये प्रवास सुरू ठेवला; तसेच खेराजभाई भानुशाली यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या मुलाला खंडणीसाठी सतत फोन केले जात होते. 

हिंदीतून संभाषण 
पोलिस मागावर आले तर आपली ओळख त्यांना मिळू नये, म्हणून अपहरणकर्ते हिंदीतून संभाषण करीत होते. त्यामुळे पोलिसांचा तपास इतर दिशेने वळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 

हेही वाचा :   नवीन वर्षात तरी बदनापूर बसस्थानक होईल का? 

दोनवेळा प्रयत्न 
संशयित आरोपी राहुल जाधव हा व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे जुना बारदाना शिऊन देण्याचे कामही करीत होता, असे तपासात पुढे आले आहे. खेराजभाई यांचा मुलगा दीपक भानुशाली हा आपल्या वडिलांना खूप जीव लावतो, याची माहिती संशयितांना होती. त्यामुळे यापूर्वी दोनवेळा खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो फसला; परंतु तिसऱ्या वेळी खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

हेही वाचा : क्राईम सिरियल पाहून जुन्या प्रियकराने काढला काटा 

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी 
या संशयितांनी चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या, एक लुटमारी केली आहे. यात एका अभियंत्याला मारहाण करून राहुल जाधव या संशयितांनी कार चोरली होती; तसेच दोन बारदान्याची दुकाने फोडली होती. त्यापैकी एका गुन्ह्यात राहुल जाधव याला अटक झाली होती. तर एक बारदाना दुकानफोडीचा मुद्देमालही स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. 

loading image