रिपोर्ट का येत नाही, वारंवार कशाला तपासता..अन् गेले की चक्क तहसीलदाराच्या अंगावर...मग काय...

राम काळगे 
Saturday, 18 July 2020

जाऊ ता. निलंगा येथील संस्थात्मक विलगीकरणातील प्रकार, पाच जणांविरूध्द किल्लारी पोलिसात गुन्हा 

निलंगा (जि. लातूर) : जाऊ (ता.निलंगा) येथील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांनी आम्ही दिलेले तपासणीचे रिपोर्ट का येत नाहीत. तुम्ही वारंवार आमचे नमुने का घेता म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी चक्क तहसीलदाराच्या अंगावर धाव घेतली. तहसीलदारांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घातल्या प्रकरणी येथील पाच जणांविरुद्ध शुक्रवारी (ता.१७) रोजी किल्लारी ता.औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

याबाबतची माहिती अशी की, जाऊ ता. निलंगा येथी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी असलेली निवासी शाळा संस्थात्मक विलगीकरणासाठी घेण्यात आली. या विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण म्हणून ठेवले जाते. सध्या येथे बाधित रुग्णाच्या संपर्कातील ५२ जण आहेत. 

या विलगीकरण कक्षाला येथील तहसीलदार गणेश जाधव यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास भेट दिली.तेथील मुस्तफा खुर्शीद लष्करे, आरिफ खुर्शीद पटेल, आतीक खाजा पटेल (रा.औराद शहाजानी) सय्यद शाकीब दुरानी, सय्यद सुभानी समदानी खान (रा. निलंगा) या पाच जणांनी आमचा तपासणीस पाठवलेला रिपोर्ट का येत नाही. तुम्ही वारंवार आमची तपासणीचे नमुने का घेता म्हणून मारहाण करण्याच्या उद्देशाने तहसीलदार गणेश जाधव यांच्या अंगावर धावून गेले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

त्यांना धमकी देऊन त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. विलगीकरण कक्षात असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची परवानगी शिवाय बाहेर येता येत नाही. तरीही कोणतीही परवानगी न घेता विलगीकरण कक्षाच्या बाहेर येऊन गोंधळ घातला.  साथरोग आदेशाचे उल्लंघन करून कसलीही खबरदारी न बाळगता मानवी जीवितास धोका निर्माण करून जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे वर्तन करून धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

गोंधळ घालून कोविड सेंटरच्या बाहेर येऊन शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तहसीलदार गणेश जाधव यांच्या फिर्यादीवरून मुस्तफा खुर्शीद लष्करे, आरिफ खुर्शीद पटेल, आतीक खाजा पटेल (रा.औरादशहाजानी) सय्यद शाकीब दुरानी, सय्यद सुभानी समदानी खान रा. निलंगा या पाच जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मेत्रेवार करीत आहेत. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या संपर्कातील लोकांचीही संख्या वाढत आहे निलंगा तालुक्यासाठी जाऊ ता. निलंगा येथील अनुसूचित जाती निवासी मुलीची वस्तीगृह व दापका ता. निलंगा येथील अनुसूचित जाती निवासी मुलीची वस्तीगृह या दोन ठिकाणी विलगीकरण कक्ष व कोविड कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा असल्यामुळे अधिकारी वर्ग व विलगीकरण कक्षातील महिला पुरूषांमध्ये खळबळ उडाली आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात गोंधळ घालणाऱ्यांना व अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणार्यावर कायदेशीर कारवाई झाल्याने अशा गोष्टीला या निमित्ताने चपराक बसणार आहे. 

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Killary police station Case file against five person