लातुरात कीर्ती उद्योगाच्या गोदामाला आग, लाखोंचा बारदाना जळून खाक

हरी तुगावकर
Friday, 11 December 2020

लातूर  येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात असलेल्या कीर्ती उद्योगाच्या गोदामाला शुक्रवारी (ता. ११) पहाटे अचानक आग लागली.

लातूर : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात असलेल्या कीर्ती उद्योगाच्या गोदामाला शुक्रवारी (ता. ११) पहाटे अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा बारदाना जळून खाक झाला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार वाहनांनी तीन तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. तरीदेखील सायंकाळपर्यंत या गोदामातून धूर येत राहिला. लातूरमध्ये कीर्ती उद्योग समूह हा मोठा उद्योग समूह आहे. एमआयडीसीमध्ये त्यांचा तेल निर्मितीचा कारखानाही आहे. रोज या उद्योगाच्या माध्यमातून मार्केट यार्डातील हजारो क्विटंल सोयाबीनची खरेदी केली जाते.

हे सोयाबीन खरेदी करण्यासाठी मार्केट यार्डातच त्यांचे मोठे गोदाम आहे. या गोदामात बारदाना मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. या गोदामाला शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. बारदाना असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता-पाहता धुराचे लोळ गोदामाच्या खिडक्यांवाटे बाहेर येऊ लागले. हा प्रकार तातडीने या भागातील नागरिक तसेच वॉचमनच्या लक्षात आला. याची माहिती तातडीने उद्योग समुहाच्या मालकांना देण्यात आली; तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलालाही याची माहिती देण्यात आली.

या दलाचे जाफर शेख व त्यांच्या पथक एक अग्निशमन दलाचे वाहन घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्याचे लक्षात आल्यानंतर इतर तीन वाहनांनाही पाचारण करण्यात आले; तसेच खासगी टँकरही मागवण्यात आले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत लाखो रुपयांचा बारदाना राख झाला होता. काही बारदाना अर्धवट जळाला होता. तातडीने कर्मचाऱ्यांनी हा बारदाना बाहेर काढला. दिवसभर या बारदान्यावर पाणी मारण्याचे काम सुरू होते. सायंकाळपर्यंत गोदामातून धूर बाहेर येतच होता. बारदाना बाहेर काढण्याचेही काम सुरूच होते. यावेळी नागरिकांनीही गर्दी केली होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kirti Industry Godown Ablazed Latur News