कोविड लसीकरणाचे करणार सूक्ष्म नियोजन : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

उमेश वाघमारे  
Tuesday, 8 December 2020

  • जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा कृती दल समितीची पहिली बैठक 
  • प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम तयार करणार 
  • शासकीय दवाखाने, शाळांसह ठिकठिकाणी केंद्र 
  • लसीकरणानंतर अर्धातास ठेवणार निरीक्षणाखाली 
  • पहिला टप्पा आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारांसाठी 

जालना : कोविडवरील लस लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही लस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे. लस टोचण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम तयार केली जाणार आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.सात) दिले आहेत. 

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

कोविड लसीकरणासाठी जिल्हा कृती दल समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कडले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मराठवाड्यातील सर्व बातम्या बातम्या वाचण्यासाठी येथे करा क्लिक

जिल्हाधिकारी श्री. बिनवडे म्हणाले, कोविडवरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसीचे डोस प्रत्येकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी शासकीय दवाखाने, जिल्हा परिषदेच्या शाळा यासह इतर उपलब्ध होणाऱ्या जागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करावी लागणार आहेत. लसीकरण केंद्रावर तीन रूम असणे आवश्यक असून पहिल्या रुममध्ये रुग्णांच्या नोंदणीची तपासणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या रूममध्ये लसीकरण तर तिसऱ्या रूममध्ये लसीकरण केलेल्या व्यक्तीला कमीत कमी अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याने स्वतंत्र अशा तीन रूम असलेली ठिकाणी प्राधान्याने तपासण्यात यावीत. कोविडवरील लसीची थंड जागेमध्ये साठवणूक करणे गरजेचे असल्याने पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरोजेस माहिती उपलब्ध करून ठेवावी. कोविड लसीवरील देखरेख व तयारीसाठी शासनामार्फत कोविन नावाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून या सॉफ्टवेअरच्या वापराबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोविडवरील लस जिल्ह्यास प्राप्त झाल्यास लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवून प्रत्येकापर्यंत लस पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांबरोबरच रोटरी, आयएमए यांच्यासह जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांची मदत लागणार आहे. हे लसीकरण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्येकाने एकसंध तसेच समन्वयाने काम करण्याची गरज असून कोरोनाच्या काळात प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने उत्कृष्टरीत्या काम केले असून लसीकरणाच्या कामातसुद्धा सर्वजण नियोजनबद्ध व उत्कृष्टरीत्या काम करून लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid vaccination will Micro Planning Collector Ravindra Binwade