झाडाच्या छताखाली मजुरांचा संसार 

बाबासाहेब गोंटे 
Saturday, 4 April 2020

मोसंबी तोडणीसह विविध कामासाठी तालुक्यात मध्यप्रदेशातून अनेक मजूर मुलाबाळांसह आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच मोसंबी तोडणीची कामे बंद झाल्याने मजूर अडचणीत सापडले आहेत.

अंबड (जि.जालना) -  मोसंबी तोडणीसह विविध कामासाठी तालुक्यात मध्यप्रदेशातून अनेक मजूर मुलाबाळांसह आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच मोसंबी तोडणीची कामे बंद झाल्याने मजूर अडचणीत सापडले आहेत. झाडाच्या छताखाली मजुरांनी संसार थाटलेला आहे. अन्नपाण्याच्या प्रतीक्षेत मुलेबाळे आहेत. 

मध्यप्रदेशातील अनेक मजुर रोजगारांच्या शोधात अंबड शहरात दाखल झालेले आहेत. मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली. या मजुरांच्या हाताला मिळणारे मोलमजुरीचे काम बंद झाले आहे. ना राहण्यासाठी निवारा,ना आश्रय. खाण्यासाठी अन्नधान्य नाही. पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र भटकंती, अशी विदारक अवस्था आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

रोजगार मिळविण्यासाठी मोठ्या अपेक्षेने मुलाबाळांसह मजूर कुंटुंब आले खरे मात्र त्यांच्यावर आता आर्थिक संकट कोसळले आहे. रस्त्याच्या कडेला लहान, थोरमंडळी नजरा लावून बसलेले असतात. कोणीतरी पोटाची आग भागविण्यासाठी दोन घास घेऊन येईल याची सतत प्रतीक्षा असते.

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर 

रोजगारांच्या शोधात आलेल्या मजुरांना संचारबंदीमुळे आपल्या घराकडे परत जाणे सध्या तरी अशक्यच आहे. त्यात रोजगार नाही. रिकाम्या हाताने किती दिवस बसावे लागणार आहे. याची चिंता आता या मजुरांना दिवसरात्र सतावत आहे. 

परराज्यातील मजूर रोजगाराच्या शोधात अंबड शहर किंवा परिसरात संचार बंदीच्या काळात अडकले असतील तर त्यांचा तात्काळ शोध घेऊन निवास व जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल. अशा मजुरांचा शोध घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. 
- शशिकांत हदगल 
उपविभागीय अधिकारी, अंबड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laborers in trouble in Ambad