मजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, मुलींच्या लग्नाची हाेती चिंता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आडगाव (ता. कन्नड) येथील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.17) दुपारी बाराच्या सुमारास घडली. पांडुरंग बाळा तायडे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेची पिशोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नाचनवेल (जि.औरंगाबाद) ः आडगाव (ता. कन्नड) येथील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.17) दुपारी बाराच्या सुमारास घडली. पांडुरंग बाळा तायडे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेची पिशोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पांडुरंग तायडे यांना शेतजमीन नव्हती. निव्वळ मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवीत होते. यादरम्यान चार मुली असताना एका मुलीचा कसाबसा विवाह झाला. त्यानंतरही तीन मुलींचे लग्न कसे करायचे यामुळे ते सतत चिंतित राहत होते; तसेच ते मनोरुग्ण होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह हा केवळ मजुरीवर होता. गेल्या पंधरवड्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मजुरी मिळत नसल्याने ते विवंचनेत होते.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात आढळला हा दुर्मिळ पक्षी

रविवारी त्यांचे संपूर्ण कुटुंब कापूस वेचणीसाठी गेलेले होते. शेतकरी भाऊसाहेब भोसले यांच्या गट क्रमांक 467 मध्ये असलेल्या विहिरीत उडी घेऊन पांडुरंग तायडे यांनी जीवनयात्रा संपविली. पोलिस पाटील रामेश्वर वाघ, दादाराव धुमाळ यांनी पिशोर पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पिशोर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला.

हेही वाचा - सराफाला साडेचाैदा लाखांचा गंडा

पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. प्रदीप जाईबहार यांनी मृतास तपासून मृत घोषित केले. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन भाऊ, चार मुली असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक एन. वाय. अंतरप, पोलिस नाईक शिवदास बोर्डे, यू. यू. नागलोत यांनी घटनास्थळ पंचनामा करून पिशोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labourer Committed Suicide Kannad