esakal | गणपूर्तीअभावी दुसऱ्यांदा उमरगा पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द! 'ऑनलाईन' सभेला नगराध्यक्षांसह सात जणच
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga Latest News

अपहार, दर्जाहीन कामे, अनियमितता आदी कारणाने पालिका नेहमी चर्चेत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभा ऑनलाईन सुरु आहेत.

गणपूर्तीअभावी दुसऱ्यांदा उमरगा पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द! 'ऑनलाईन' सभेला नगराध्यक्षांसह सात जणच

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  सर्वसाधारण सभा रद्द, तहकुब होण्याचे प्रकार उमरगा पालिकेत वारंवार घडत आहेत. त्याला वेगवेगळ्या अंतर्गत कारणांची झालर असते. मात्र रेकॉर्डवर मात्र गणपुर्ती नसल्याचे कारण समोर येते. दरम्यान २८ सप्टेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर दोन सर्वसाधारण सभा गणपूर्तीअभावी रद्द करावी लागली, तर स्थायी समितीच्या एका बैठकीवर सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. पालिकेच्या सदस्यांमध्ये असलेल्या मतभेदाचे रुंपातर मनभेदात होत असल्याने अडवणूकीचा प्रकार सुरू आहे.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ


अपहार, दर्जाहीन कामे, अनियमितता आदी कारणाने पालिका नेहमी चर्चेत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभा ऑनलाईन सुरु आहेत. नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी प्रेमलता टोपगे यांनी शहराच्या विविध विकास कामांच्या चर्चेबाबत २८ सप्टेंबर २०२० रोजी सर्वसाधारण सभा घेतली होती. त्यानंतर सात जानेवारीला ऑनलाईन सभा बोलावली होती. दुपारी बारापर्यंत टोपगे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अतिक मुन्शी, विक्रम मस्के, ललिता सरपे चौघेच ऑनलाईन बैठकीला जॉईंन झाल्याने टोपगे यांनी ही सभा गणपूर्तीअभावी रद्द केली होती.

वाचा - रात्री फिरणे दूरच, रस्त्यावर थांबताही येणार नाही! औरंगाबादेत आठ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी

त्यामुळे नगराध्यक्षा सौ. टोपगे यांनी मंगळवारी (ता.२३) सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण सभा बोलावली होती. मात्र टोपगे यांच्यासह काँग्रेसचे सदस्य विक्रम मस्के, ललिता सरपे, राष्ट्रवादीचे संजय पवार, शिवसेनेचे पंढरीनाथ कोणे, प्रतिभा चव्हाण, भाजपच्या सुनंदा वरवटे यांच्यासह मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर ऑनलाईन सभेला जाॅईन झाले. पंचवीसपैकी सात जणच असल्याने ही सभा गणपूर्तीअभावी रद्द करावी लागली.

या सभेत प्रभाग एक ते अकरा येथे विविध विकास कामे सूचवणे, प्रत्येक विभागाकडून वार्षिक निविदा मागवणे, अंतुबळी सांस्कृतिक सभागृह भाड्याने देणे आदी महत्त्वाचे विषय होते. मात्र ते आता मागे पडले. दरम्यान सभेला उपस्थित न रहाण्यासाठी काही जणाकडून ठरवून निर्णय घेतला जात असला तरी रस्ते कामाचे बिल काढण्यासाठी अप्रत्यक्षरित्या होणारी अडवणूक व त्यासाठीची टक्केवारी हा मूळ कळीचा मुद्दा असल्याची चर्चा होत आहे. पालिकेत सध्या "आर्थिक" मुद्यावर अधिक भर दिला जात असुन नागरिकांच्या अडचणीकडे मात्र डोकेझाक केली जात असल्याची चर्चा होत आहे.

शहराच्या विकास कामांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी दोन वेळा सर्वसाधारण सभा बोलावली होती. काही सदस्यांची नेहमी नकारात्मक भूमिका असल्याने सभेची गणपुर्ती होत नाही. सदस्यांनी कांही अडचणी असतील तर त्या प्रत्यक्ष सां
गाव्यात. सभेला गैरहजर रहाणे संयूक्तीक वाटत नाही.
- प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा

संपादन - गणेश पिटेकर