अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

गौस शेख
Thursday, 28 January 2021

सुरवातीचे काही दिवस या मुली फोन करून आपल्या आई- वडिलांना बोलत होत्या. परंतु नंतर यातील तेरा वर्षांच्या मुलीचे फोनवर बोलणे बंद झाले.

बेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या चुलत्याने हा विवाह लावून दिल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदाळा (ता.औसा) येथील रामदास प्रकाश वेदपाठक उर्फ बाळू ( वय २९) व पीडितेचा चुलता हे दोघे पीडित मुलीच्या वडीलाचा हात मोडला असल्याने त्यांना पाहण्यासाठी हैदराबाद येथे गेले होते.

नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 

पीडितेच्या वडिलांना पाहिल्यानंतर परतत असताना आपल्या भावाच्या दोन्ही मुलींना मकरसंक्रांत या सणानिमित्त गावाकडे घेऊन जातो असे म्हणत पीडित मुलीसह तिच्या बहिणीला आपल्या सोबत घेऊन येळनूर (ता. निलंगा) या गावी आले. सुरवातीचे काही दिवस या मुली फोन करून आपल्या आई- वडिलांना बोलत होत्या. परंतु नंतर यातील तेरा वर्षांच्या मुलीचे फोनवर बोलणे बंद झाले. याच काळात पीडित मुलीच्या दुसऱ्‍या एक चुलत्याने फोन करून तुमच्या तेरा वर्षांच्या मुलीचा विवाह शिंदाळा (ता.औसा) येथील रामदास वेदपाठक (उर्फ बाळू) या होमगार्डसोबत करून दिल्याचे पीडित मुलीच्या वडिलाला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलाने मुलीशी संपर्क साधून घटनेची माहिती विचारली असता घडलेला प्रकार तिने सांगितला. 

न थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास

सदरील अल्पवयीन मुलीचा विवाह ता.आठ जानेवारी रोजी सास्तूर-माकणी या ठिकाणी लावून देण्यात आला होता. लग्नानंतर रामदास वेदपाठक (उर्फ बाळू) याने तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलिस ठाण्यात रामदास वेदपाठक (उर्फ बाळू) यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार तर चुलत्या विरोधात बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती हे करीत आहेत. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Crime News Charge Filed Against Man For Assaulting Minor Girl