
साडेदहा हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांत ११४ पॉझिटिव्ह, ९२ टक्के शाळांत वीस टक्के विद्यार्थी,
लातूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. हे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेतली. रविवारी (ता. २९) तपासणीचे काम पूर्ण झाले. तपासणीत जिल्ह्यातील दहा हजार ६३० पैकी ११४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ५७ शाळा बंद आहेत. दरम्यान, ९२ टक्के शाळांचे कामकाज सुरू झाले तरी या शाळांत २० टक्के विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
सरकारने २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी व दहावी तर उच्च माध्यमिकचे अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली. यात शाळांची निर्जंतुकीकरण करण्यासोबत शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. मागील आठवड्यापासून आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. रविवारी तपासणीचे काम पूर्ण झाले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यात सहा हजार ६४५ जणांची आरटीपीसीआर तर तीन हजार ९८५ जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात आरटीपीसीआर तपासणीतून ८९ तर अँटीजेनमधून २५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांत ग्रामीण भागातील ७७ तर लातूर शहरातील ३७ जणांचा समावेश आहे. निलंगा तालुक्यात सात, लातूर (ग्रामीण) - १४, औसा, जळकोट व रेणापूर प्रत्येकी दोन, अहमदपूर - सहा, चाकूर - दहा, शिरूर अनंतपाळ - २२ तर उदगीर तालुक्यात २३ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. देवणी तालुक्यातील ३४२ शिक्षकांपैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीत दिसून आल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पॉझिटिव्ह शिक्षकामुळे ५७ शाळा बंद
जिल्ह्यातील एकूण ६३२ माध्यमिक शाळांपैकी ६०२ तर २७६ उच्च माध्यमिक शाळांपैकी २५० शाळा सुरू झाल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी सांगितले. माध्यमिक शाळांतील नववी व दहावीच्या ९२ हजार ८३७ पैकी २२ हजार ४४५ विद्यार्थी अकरावी व बारावीच्या ७० हजार १२३ पैकी सहा हजार ५८२ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. सुरू झालेल्या ९२ टक्के शाळांत १९.५ टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत. या वर्गांसाठीच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाली असून, यात ८८ शिक्षक तर २६ शिक्षकेत्तर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण ११४ शिक्षक व कर्मचाऱ्यांमुळे ३० माध्यमिक व २७ उच्च माध्यमिक अशा एकूण ५७ शाळा बंद ठेवण्यात आल्याचे उकिरडे यांनी सांगितले.
(संपादन-प्रताप अवचार)