लातूर जिल्ह्यात धो-धो : मांजरा, तेरणा नदी तुडुंब, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

vij news.jpg
vij news.jpg

लातूर : जिल्ह्यात मंगळवारी (ता. १५) रात्री सर्वदूर पाऊस झाला. देवणी, निलंगा आणि उदगीर तालुक्यांत तर मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. नदी-ओढ्यांना पूर आला तर देवणी तालुक्यातील दवणहिप्परगातील खटकाळी आणि बोरोळ या दोन गावांतील पाझर तलाव फुटले. दोन पूलही वाहून गेले. विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. शिवाय शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले. दवणहिप्परगातील येथे अनेकांच्या घरांत, दुकानांत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. 

सिंधीकामठ-लखनगाव रस्ता बंद 
बोरोळ परिसरात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. दवण हिप्परगातील खटकाळी व बोरोळ (ता. देवणी) दोन पाझर तलाव फुटले. शिवाय ओढेही पात्र सोडून वाहत अनेकांच्या शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले. सिंधीकामठ-लखनगाव हा आंतरराज्य मार्गही बंद झाला आहे. विजेच्या तारा तुटल्याने ग्रामस्थांना मंगळवारची रात्र अंधारात काढावी लागली. दवणहिप्परगा येथील चौकातील अनेक दुकाने, हॉटेल आणि घरांमध्ये बारा तासांत दोनदा पाणी शिरले. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून, दिवसभर दुकानदारांना भिजलेला माल इतरत्र हलवून आत साचलेला गाळ बाहेर काढावा लागला. दोन वाहून जाणाऱ्या दुचाकी पुलाच्या कठड्याला अडकल्याने ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत त्या बाहेर काढल्या. 

देवणीत दोन पूल गेले वाहून 
मुसळधार पावसाने प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तालुक्याने वार्षिक सरासरीची पातळी ओलांडली आहे. तीन दिवसांपासून तालुक्यात मोठा पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री दहानंतर सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तळेगाव-देवणी या रस्त्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेला. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाला जोडणाऱ्या रस्त्यावर बोंबळीजवळील पुलावरून पाणी जात तो रस्ताही बंद होता. भोपणी गावात जाणारा पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. 

निलंगा तालुक्यातही मुसळधार 
शहरासह तालुक्यातील विविध भागात बुधवारी (ता. १६) मुसळधार पाऊस झाला. ओढे, नाले दुथडी भरून वाहिले आहेत. तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीपातळीत वाढ झाली. निटूर, आंबुलगा बु., शेडोळ, निलंगा, औराद शहाजानी, हलगरा यासह आदी भागात सकाळच्या वेळी जोरदार पाऊस झाला. मांजरा, तेरणा नदीला पूर आला. सावनगिरा येथील ओढ्याच्या पुरामुळे रस्ता काही काळ बंद होता. पावसामुळे मसलगा मध्यम प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली. तालुक्यातील बडूर, हंगरगा, निलंगा, शेडोळ, केदारपूर, जाऊ येथील प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. हाडगा रस्त्यावर वीज कंपनीच्या कार्यालयाजवळ पावसाने बाभळीचे मोठे झाड रस्त्यावर पडले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 

निलंग्यातील पीरपाशा दर्गाहवर वीज कोसळली 
निलंगा शहरात वीजगर्जनेसह मोठा पाऊस सुरू होता. सकाळी ११: ३० च्या दरम्यान येथील पीरपाशा दर्गाहच्या घुमटावर वीज कोसळली. हा दर्गा २५१ वर्षे जुना आहे. तो सध्या पर्यटन विभागाच्या देखरेखीखाली आहे. 

निलंग्यातील पीरपाशा दर्गाहवर वीज कोसळली 
शहर व परिसरात दमदार पाऊस झाला. तालुक्यातील कासराळ (ता. उदगीर) येथे वीज पडून म्हैस व वासरू दगावले असून, मोघा मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोगा महसूल मंडळातील तोगरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. गावातून जात असलेल्या नाल्यातून जास्त प्रमाणात पाणी वाहिले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन व उडिदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

कालवा फुटून बारा एकरांतील सोयाबीन गेले वाहून 
शिरूर अनंतपाळ- तालुक्यात दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाने घरणी प्रकल्पाचा डावा कालवा फुटला. त्यामुळे १२ एकरांवरील सोयाबीन वाहून गेले. शिवाय शेतजमीनही खरडून गेली. मातीच्या जागी दगड व मुरूम वाहून आले आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकरी गोविंद धुमाळे, अंतेश्वर धुमाळे, व्यंकट धुमाळे, माधव धुमाळे, भगवान धुमाळे, आनंदा कामगुंडा यांचे मोठे नुकसान झाले. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com