वाहतूक नियंत्रणासाठी लातूरचे पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर, केले वेगवेगळे प्रयोग

हरी तुगावकर
Tuesday, 22 December 2020

लातूर शहरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे ठिकाण म्हणून शिवाजी चौकाकडे पाहिले जाते.

लातूर : शहरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे ठिकाण म्हणून शिवाजी चौकाकडे पाहिले जाते. येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नाकेनऊ येते. पण, ही कोंडी काही केल्या फुटत नाही. या चौकात कशा पद्धतीने वाहतुकीचे नियंत्रण करता येईल हे पाहण्यासाठी नूतन पोलिस अधीक्षक (एसपी) निखिल पिंगळे मंगळवारी (ता. २२) सकाळी रस्त्यावर उतरले. एक दीड तास त्यांनी उभे राहून वेगवेगळे प्रयोग करून वाहतुकीवर कसे नियंत्रण मिळवता येईल हे त्यांनी पाहिले.

 

 

गेल्या काही वर्षात वाहनांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसून येतात. यात शहरातील शिवाजी चौक हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. शिवाजी चौकात उड्डाण पूल असला तरी त्याचा फारसा वापर होत नाही. बहुतांश वाहनधारक नेहमीच्याच रस्त्याचा वापर करताना दिसतात. याच भागातून जुन्या रेल्वे लाइनचाही रस्ता गेलेला आहे. शहरातील मुख्य रस्ता आणि जुन्या रेल्वे लाइनचा रस्त्यावरून एकाच वेळी शिवाजी चौकात येतात.

 

 

त्यामुळे नेहमीच या चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या चौकात सिग्नल लावण्यात आले आहेत. पण, त्याचा फारसा उपयोग होत नाही. लाऊड स्पिकरची योजनेचाही उपयोग झाला नाही. आतापर्यंतच्या आलेल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पण, परिस्थिती जैसे थेच राहिली आहे. वाहतुकीची कोंडी काही केल्या संपलेली नाही. त्यात सकाळी आणि सायंकाळी शासकीय कार्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी ही कोंडी अधिकच होते. वाहतुकीवर कसे नियंत्रण मिळवता येईल यासाठी मंगळवारी सकाळीच पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे हे शिवाजी चौकात रस्त्यावर आले. एक दीड तास त्यांनी वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.

 

 

लातूरच्या शिवाजी चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. ट्रॅाफिक सिग्नलचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या चौकात वेगवेगळे प्रयोग करून वाहतुकीवर नियंत्रण आणता येते का? ते पाहिले जात आहे. येत्या काही दिवसात या चौकात वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
- निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक.

 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Police Superintendent Step Down For Traffic Control