सात हजारांची लाच प्रकरणी ग्रामसेवकाला तीन वर्षांची शिक्षा, लातूर न्यायालयाचा निकाल

हरी तुगावकर
Wednesday, 17 February 2021

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय सहा लातूर यांच्या न्यायालयात झाली.

लातूर : लाच घेतल्या प्रकरणी न्यायालयाने जठाळा (ता.चाकूर) येथील ग्रामसेवकाला तीन वर्षाची शिक्षा तसेच २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. जठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोलीचे दुरुस्तीचे काम या प्रकरणातील तक्रारदाराने केले होते. त्या कामाचे एक लाख २२ हजार १८० रुपये बिल मंजूर झाले होते. बिलाच्या चेकवर सही करण्यासाठी ग्रामसेवक श्रीकांत पतंगे याने सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या संबंधी दहा सप्टेंबर २०१२ रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.

वाचा : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईजवळ बसून चिमुकले बहीण-भाऊ दिवसभर रडले, बापाच्या कृत्याने शेजारी गेले चक्रावून

त्यानंतर पोलिसांनी याची पडताळणी केली. यात पतंगे याने सात हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. याच दिवशी हॉटेल मयूर येथे ग्रामसेवक प्रल्हाद कानुरे यांच्याकडे ही रक्कम देण्यास सांगून त्यांच्या मार्फत पतंगे याने ही लाच स्वीकारली होती. ही लाच घेताना पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन पोलिस उपअधीक्षक एन. जी. अंकुशकर यांनी या प्रकरणी येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

वाचा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मावशीचे निधन, वीस मिनिटांची भेट ठरली शेवटची

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय सहा लातूर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्या वतीने एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यात अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने बुधवारी (ता. १७) निकाल दिला. यात ग्रामसेवक पतंगे याला कलम सात प्रमाणे तीन वर्ष व दहा हजार रुपये दंड तसेच कलम १३ अन्वये तीन वर्ष व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ग्रामसेवक कानुरे यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी काम पाहिले.

मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Today News Gram Sevak Get Three Years Punishment For Taking Bribe