लातूर झेडपीचे सीईओ नांदेडचे जिल्हाधिकारी; पहिल्याच टर्ममध्ये धडाकेबाज कामगिरी

विकास गाढवे
Sunday, 16 February 2020

दुसऱ्याच टर्ममध्ये जिल्हाधिकारी झालेले ते अलीकडच्या काळातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी येथे पहिल्याच टर्ममध्ये केलेली धडाकेबाज कामगिरी पुढील काळात त्यांची सर्वांनाच आठवण देणारी ठरणार आहे.

लातूर : जिल्ह्यात प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झाले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त एम. डी. सिंह यांची बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांचीही बदली झाली आहे. त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून संधी मिळाली आहे.

दुसऱ्याच टर्ममध्ये जिल्हाधिकारी झालेले ते अलीकडच्या काळातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी येथे पहिल्याच टर्ममध्ये केलेली धडाकेबाज कामगिरी पुढील काळात त्यांची सर्वांनाच आठवण देणारी ठरणार आहे.

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर

गडचिरोली येथून त्यांची 29 नोव्हेंबर 2017ला लातूरला बदली झाली. 2014 च्या बॅचचे अधिकारी असलेले डॉ. ईटनकर हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात चौदावे व राज्यात प्रथम आले होते. येथे रूजू झाल्यापासून त्यांनी आपल्या कामातून वेगळी छाप पाडण्यास सुरवात केली.

आमचे जुळले, तुमचे कसे जुळले जरा सांगा की...

कार्यालयीन कामकाजात तसेच कक्षासमोरच्या पाटीवर त्यांनी केवळ `डॉ. विपिन` (आयएएस) एवढ्याच नावाचा उल्लेख ठेवला. `सिर्फ नामही काफी है`, अशी सुरवात करत नाव कायम स्मरणात राहिल, असेच काम गेल्या सव्वा दोन वर्षात येथे केले. त्यांची जिल्हा परिषदेतील पहिली नियुक्ती होती. जिल्हा परिषदेचे कामकाज समजून घ्यायला वर्षानुवर्षे लागतात. मात्र, त्यांनी काही महिन्यातच जिल्हा परिषद तोंडपाठ करून घेतली.

त्यांच्याच काळात पंचायतराज समितीचा दौरा झाला. या दौऱ्यातही त्यांनी मुरब्बी अधिकाऱ्याचा अनुभव समितीला आणून दिला. आरोग्य व शिक्षण हे त्यांच्या आवडीचे विषय असले, तरी गरीबांच्या घरकुलाचा प्रश्नही त्यांनी नेहमीच हाताळला. रूजू होताच त्यांनी जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी धाडसी पावले उचलली. पाणंदमुक्तीतील सर्व अडचणी दूर करून काही गावांना वर्गणी जमा करून व सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला. पाणंदमुक्तीचा पहिला डाव जिंकून त्यांनी अन्य प्रश्नाकडे लक्ष दिले.

परीक्षेत पास करतो, म्हणून तिला एकटीलाच बसवले वर्गात

प्राथमिक आरोग्य केंद्रांना शिस्त लावली. केंद्रातील डॉक्टरांची उपस्थिती वाढवली. दर्जेदार आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारच्या उपक्रमात अनेक केंद्रांना त्यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय मानांकन मिळाले. मनमोकळ्या स्वभावाचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अनेक दिवस बंद पडलेल्या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू करून त्यांनी सर्वासोबत सुसंवाद वाढवला. शाळा डिजीटल करण्यासोबत अनेक शाळांना त्यांच्यामुळे शिक्षक मिळाला. अशा एक ना अनेक कामांच्या त्यांनी येथे आठवणी करून ठेवल्या आहेत. त्यांना सातत्याने उजाळा मिळत राहणार आहे.

वंचितांना नेहमीच न्याय

अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेतील अनुकंपा तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया बंद होती. ती सुरू करून त्यांनी शंभरहून अधिक जणांना जिल्हा परिषदेत नोकरी दिली. बदली असो की कंत्राटी नोकर भरती असो, त्यांनी नेहमीच वंचितांना न्याय दिला.

नांदेडात भरणार शंकर दरबार

प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अंशकालीन परिचर भरतीत त्यांनी मोठ्या संख्येने केलेली विधवा महिलांची नियुक्ती जिल्हा कधीच विसरणार नाही. यातून त्यांनी अनेक अबला महिलांना सबला करण्याचे काम केले. असेच काम नांदेड जिल्ह्यात करण्याचा त्यांचा निर्धार आहे. आदिवासी क्षेत्रात काम केल्याच्या अनुभवाचा फायदा नांदेडमध्ये काम करताना नक्की होईल, असे त्यांना वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur ZP CEO Vipin Itankar Now Nanded Collector District Magistrate News