वाचायला शिकतो तसे चित्रपट पाहायला शिकाःअभिनेते डॉ. मोहन आगाशे

लातूर : मानसरंग चित्रपट महोत्सवात शनिवारी प्रेक्षकांशी संवाद साधताना डॉ. मोहन आगाशे. शेजारी डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. दिनेश पाटील.
लातूर : मानसरंग चित्रपट महोत्सवात शनिवारी प्रेक्षकांशी संवाद साधताना डॉ. मोहन आगाशे. शेजारी डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. दिनेश पाटील.

लातूर : वाचण्याइतके लिहिणे सोपे नसते, त्याप्रमाणे चित्रपट पाहण्याइतके तो तयार करणे सोपे नसते. पण आपण वाचायला शिकतो तसे चित्रपट पाहायलासुद्धा शिकले पाहिजे. चित्रपटांतील बारकावे टिपता आले पाहिजेत, तरच चित्रपट समजतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी येथे व्यक्त केले. 

स्वर, अभिजात फिल्म सोसायटी आणि अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे येथे शनिवारपासून (ता. 30) मानसरंग चित्रपट महोत्सव सुरू झाला. सुरवातीला "कासव' आणि "अस्तू' हे चित्रपट दाखविण्यात आले. या चित्रपटांवर संवाद साधत चित्रपट कसा बघितला पाहिजे, यावर डॉ. आगाशे यांनी मुक्तचिंतन मांडले. त्यातून चित्रपट रसास्वादाचाच तास रंगत गेला. आयोजक डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते. 

मन संगीतासारखे

सर्वांच्याच आयुष्याची सुरवात अभिनयाने होत असते. बालपण नकला करण्यातच जाते. नंतर आपण बोलायला, वाचायला, लिहायला शिकतो. मला लहानपणी वाचनातून शिक्षण घेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे मी ज्यांना वाचून समजते, अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलो. पुढे नाटकांकडे वळलो. नाटक करता-करता शिकत गेलो, असे सांगून डॉ. आगाशे म्हणाले, मन ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. माणूस आजारी असो किंवा निरोगी, मनाशिवाय जगण्याला अर्थच नाही. मन नावाची गोष्ट शरीर वाहत असते. शरीर केवळ मनाचे वाहन आहे. खरेतर मन संगीतासारखे आहे. वाद्य मोडते; पण संगीत नाही, तसे मनाचे आहे. 

उलगडले बारकावे

"कासव' चित्रपटात कासव, तर "अस्तू' चित्रपटात हत्ती हे प्रतीक का वापरले, चित्रपट संपल्यानंतरही तो मनात का घोळत राहतो, मनाशी संबंधित चित्रपट विचारप्रवर्तक कसे असतात आदी बारकावे डॉ. आगाशे यांनी उलगडून दाखवले. अनेक बाबी आपल्या जीवनात येत नाहीत, घडत नाहीत. चित्रपटाच्या माध्यमातून मात्र त्या पडद्यावर घडत असतात. म्हणून चित्रपट आवडत असतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

लढत विधानसभा अध्यक्षपदाची : कोण आहेत पटोले? कोण कथोरे?
माणूस असणे हीच खरी ओळख 
कुठलेही काम करताना आपली त्यात समर्पण वृत्ती असली पाहिजे. पण, आपण आपल्या नावापुढे वेगवेगळ्या पदव्या लावण्यातच धन्यता मानतो. मी ह्युमॅनिस्ट आहे, असे कोणी म्हणत नाही. खरेतर माणूस असणे हीच आपली खरी ओळख आहे. पण तिचा विसर पडत चालला आहे की काय, असा प्रश्न मला पडतो, अशी खंतही डॉ. आगाशे यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com