लायन्स क्लब देणार निराधारांना जेवणाचा डबा

शिवचरण वावळे
गुरुवार, 26 मार्च 2020

शुक्रवार (ता. २७ मार्च २०२०) ते १४ एप्रिलपर्यंत नांदेड शहरात लॉयन्सकडून जेवनाचा डबा देण्यात येणार आहे. यासाठी अन्नदात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. विजय भारतीया आणि प्रोजेक्ट चेअरमन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

नांदेड : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेमुळे नांदेड शहरात संचारबंदी सुरु आहे. संचारबंदी कधी उठेल हे सांगता येत नाही. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत. त्यांच्या भोजनाची गैरसोय होत आहे. हॉटेल व खानावळ बंद असल्यामुळे बाहेर गावाहून नांदेडमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन मिळत नाही. या शिवाय निराधारांना भोजनाची नितांत गरज आहे.

शुक्रवार (ता. २७ मार्च २०२०) ते १४ एप्रिलपर्यंत नांदेड शहरात लॉयन्सकडून जेवनाचा डबा देण्यात येणार आहे. यासाठी अन्नदात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. विजय भारतीया आणि प्रोजेक्ट चेअरमन दिलीप ठाकूर यांनी केले आहे. लॉयन्सचा डबा या उपक्रमात गेल्या दोन वर्षापासून नांदेडच्या रयत रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाना दररोज तीस डबे पुरविण्यात येत आहेत. संचारबंदी असताना देखील लायन्सच्या डब्यात खंड पडलेला नाही. यापूर्वी देखील सतत नऊ वर्ष शासकीय रुग्णालयात भाऊचा डबा पुरवण्यात येत होता. नांदेड शहरातील सद्य परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीने लॉयन्स परिवार डबे वितरीत करणार आहे.

हेही वाचा- जन्मलेलं बाळ बोललं की जागे रहा... अन रात्रभर लोकं जागेच

लायन्स कडून आवाहन
आणीबाणी प्रसंगी प्रत्येकाच्या मनात काहीतरी चांगली काम करण्याची इच्छा असते. पण योग्य मार्ग मिळत नाही. त्यामुळे ज्यांना डबे देण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया त्वरित लॉयन्स क्लबच्या कोणत्याही सदस्यांशी संपर्क साधावा. या उपक्रमामध्ये लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊन तसेच लॉयन्स क्लब नांदेड सफायर देखील सक्रिय सहभाग घेत आहे. अनेक दानशूर नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.
हेही वाचलेच पाहिजे- Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

तुम्ही सुद्धा योगदान देऊ शकता
यामध्ये सुभाष बंग यांनी २०० डबे, आदित्य बालकिशन जाजू यांनी २०० डबे, प्रा. दीपक बच्चेवार १०० डबे, ज्ञानेश्वर महाजन यांनी १०० डबे, अद्वैत उंबरकर १०० डबे, संदीप काला १०० डबे, मयूर मोदी १०० डबे, अजय बाहेती १०० डबे, अजय राठी १०० डबे, व्यंकटेश पारसेवार १०० डबे, अनिल लद्धा १०० डबे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात तुम्ही सुद्धा अन्नदन करुन योगदान देऊ शकता.

 

विद्यार्थ्यांनो जेवण हवाय का इथे साधा संपर्क
शहरात राहुन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील कोरोनाचे इतके भयानक संकट जगावर येईल याची कल्पानाच नव्हती. त्यामुळे अभ्यासात मग्न असताना देश लॉक डाऊन झाला आणि विद्यार्थ्यांची जेवणाची मेस बंद झाली. विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु अशा गरजवंत विद्यार्थ्यांच्या मदतीला लायन्सचा डबा धावून आला आहे. ज्या विद्यार्थ्यांने जेवणाची गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी 9421839333 या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना जेवण जागेवर पोहचविले जाणार आहे.
-दिलीप ठाकूर

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Lions Club will be giving lunch to the destitute Nanded News