लॉकडाऊन : ‘त्या’ विद्यार्थ्यांना लॉयन्सने दिले पुरणपोळीचे जेवण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

गुढीपाडवा मराठी वर्षाची सुरवात होणार सण. मात्र, त्याच्यावर ‘कोरोना’चे सावट पसरल्यानंतर हे सावट पुढील सर्वच सणांवर उत्सवावर गडद होत आहे. देशभरात सध्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अचानक ओढावलेल्या लॉकडाऊनच्या संकटामुळे अनेक कामगार, विद्यार्थी अद्यापही घरी पोहचु शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जेवणाची आबाळ होणे साहजिकच आहे. अशांसाठी लॉयन्सने पुढाकार घेत त्यांना पुरणपोळीचे जेवण दिले आहे. 

नांदेड : राम नवमी गुरुवारी (ता.दोन) एप्रिलला असल्याने अनेकांच्या घरी गोडधोड ऋचकर जेवण असतेच. त्यामुळे सध्या घरी न पोहचु शकलेल्या विद्यार्थ्यांना आईच्या हातच्या गोड जेवणाची आठवण आल्या शिवाय राहत नाही. तेव्हा मागील आठ दिवसांपासून गरजवंताना जेवणाचा डब्बा पुरविणाऱ्या लॉयन्स क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना घरी नका जाऊन म्हणत चक्क घरच्याप्रमाणे त्यांच्यासाठी पुरणपोळीचे जेवण पुरविल्याने अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी भारावून गेल्या होत्या.
 
 गुरुवारी सकाळी पाच वाजता दिलीप ठाकूर यांना एका विद्यार्थ्याचा रडक्या आवाजात फोन आला. सर मला उदगीरला गावी जायचे आहे. वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती त्याने केली. मात्र, लॉकडाऊन मुळे घरी जाणे शक्य नसल्याचे सांगून, तुला तर लॉयन्सचा जेवणाचा डबा घरपोच मिळत आहे. अजून काही मदत हवी असेल तर सांग. म्हणताच त्याला आईच्या हातच्या पुरणपोळीची आठवण झाली. विद्यार्थ्याने दिलीप ठाकुर यांच्याकडे बोलुन दाखवताच त्यांनी शक्य तेवढ्या डब्यात पुरणपोळी देण्याचे ठरविले आणि घरापासून दूर असलेल्या त्या सर्व विद्यार्थ्यांना लॉयन्सकडून मस्त पुरणपोळीचे जेवण मिळाले.\

हेही वाचा- इतिहासात दुसऱ्यांदा रेल्वेची धडधड थांबली, कशी? ते वाचलेच पाहिजे

डब्यात पुरणपोळी
दिलीप ठाकूर यांनी डबे बनविणाऱ्या मन्मथ स्वामी यांच्याशी फोनवर संपर्क साधला, पण त्यांचा फोन बंद येत होता. मग त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व आजच्या डब्यात सर्वांसाठी पुरणपोळी करण्याची सूचना केली. मात्र, इतक्या डब्यात पुरणपोळी देणे शक्य नसल्याचे श्री.स्वामी यांनी सांगितल्याने त्यासाठी एक दिवसाचा अवधी हवा होता, असे त्यांनी सांगितल्यानंतर जेवढ्यांना शक्य तेवढ्यांना पुरणपोळी व उर्वरित इतरांना शिरापुरी देण्याचे ठरले. दररोज डबा देण्याच्या नियमित वेळेपर्यंत १८० पुरणपोळीची व १४५ शिरा पुरीची पाकिटे तयार करून कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी व मेस बंद असल्यामुळे अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना घरपोच जेवणाचे डबे देण्यात आले. 

हेही वाचलेच पाहिजे- सहाय्यक फौजदाराचा कर्तव्यादरम्यान मृत्यू

राजश्री पब्लिक स्कूल नांदेडतर्फे शंभर डबे​

डबे वितरण करण्यासाठी लॉयन्स मिड टाऊनचे अध्यक्ष योगेश जैस्वाल, लॉयन्स मेनचे अध्यक्ष शिवकुमार सुराणा, लॉयन्स सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. विजय भारतीया, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, दिलीप ठाकूर, राजू शाहू, दिनेश सगरोळीकर, विक्की स्वामी, राजेशसिंह ठाकूर यांनी परिश्रम घेतले. लॉयन्सच्या डब्यामुळे रामनवमीचा सण गोड झाला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. राजश्री पब्लिक स्कूल नांदेडतर्फे शंभर डबे तर आनंद चिमकोंडवार, अशोक जाधव, सुभाष गादेवार, पंजाबराव देशमुख, भानुदास मोहनपूरकर  यांनी प्रत्येकी पन्नास डबे देण्यासाठी संमती दिल्याची माहिती डॉ. भारतीया यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lion's Supper Meal For 'Those' Students Nanded News