बीड जिल्ह्यातील शेतीची वाताहत, कांदा सडला, फळ बागायतदारांनाही फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

किल्लेधारूर (जि. बीड) - कांद्यामुळे वांदा झाल्याचे अनेकवेळा पाहिले आहे; मात्र कोरोनाच्या वांद्यामुळे कांदा सडू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.  कांद्याचे भाव थेट सत्तरी पार करून पुढे गेलेले पाहून चार महिन्यांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. कांदा परिपक्व होऊन विक्रीसाठी तयार झाल्यानंतर काढला; मात्र लॉकडाउनमुळे कांद्यास बाजारपेठ न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांकडे काढलेले कांदा पीक जशास तसे पडून आहे.

 काही कांदा आता सडू लागल्याने शासनाने प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करून शेतकरीवर्गास मदत करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात किल्लेधारूर येथील अर्जुन सत्त्वधर व अंबेवडगावचे शेतकरी रामहारी वाघमोडे म्हणाले, कोरोना साथीमुळे संपूर्ण मार्केट बंद आहे. कांदा विकण्यासाठी मार्केट सुरू होण्याची गरज आहे. कांदा नासकी वस्तू आहे. तो जास्त दिवस साठवता येत नाही. एवढा कांदा घरोघरी जाऊन विकणे शक्य नाही. उन्हामुळे कांदा नासू लागला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी भाव देतात. नाही तर घेत नाहीत. 

टरबुजाला कवडीमोल भाव 
फळशेतीत यंदा कोरोना संकटामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असून कवडीमोल दराने टरबुजासारखे फळपीक विकण्याची वेळ उत्पादक शेतकरी श्रीनिवास शिनगारे यांच्यावर आली आहे. कोरोना व्हायरसने जगात प्रत्येकाला घरात कैद केले. यामुळे अनेकांच्या उत्पन्नावरही गदा आली. सतत वेगवेगळे प्रयोग करून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरही नवीन समस्या या संकटामुळे उभ्या राहिल्या आहेत. 
जागतिक समस्या बनलेल्या कोरोना व्हायरसने सर्वच क्षेत्र डबघाईला आणले आहे. यात शेतकरीही सुटला नाही. या काळात अनेक शेतकऱ्यांना टरबूज शेती अपेक्षित उत्पन्न देण्यात अपयशी ठरली.

शहरातील श्रीनिवास दामोदरराव शिनगारे या शेतकऱ्याने प्रथमच दीड एकर क्षेत्रात टरबुजाचे पीक घेतले. सहा महिने राब राब राबून उच्च प्रतीचे टरबुजाचे उत्पादन केले. नेमके हातात पीक येण्याच्या काळातच कोरोना व्हायरसने देशात पाय पसरले. श्री. शिनगारे यांची जमीन तांदळवाडी शिवारातील खारी या सुपीक प्रदेशात आहे. अनेक स्वरूपाच्या हंगामी व रब्बी पिकांसह फळशेतीही केली जाते.

यावर्षी दीड एकर टरबूज तर एक एकर शेतात खरबुजाची शेती केली. टरबुजाच्या शेतीतून अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ऐन फळ विक्रीयोग्य होताच आलेल्या कोरोना संकटाने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान केले. श्रीनिवास शिनगारे यांनी फळविक्री करून किमान खर्चाची बरोबरी करून नुकसानीपासून बचाव केला. प्रत्यक्ष शेतात अक्षरशः फळांचा खच पडला आहे. व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे बेभाव विक्री करून लाखो रुपयांचे उत्पन्न कोरोनामुळे हातचे गेले. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

बाजारपेठेअभावी मिरचीचा ठसका 
टाकरवण : यंदा टाकरवणसह परिसरात भाजीपाला, कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊन देखील लॉकडाउनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकऱ्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात माल विकावा लागत आहे. लागवडीसाठी झालेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतात. गोदावरी पात्राचा फायदा टाकरवणसह परिसरातील शेतकऱ्यांना झाला. या शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले आल्याने उत्पन्नदेखील चांगले मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे टोमॅटो, भेंडी, मिरची, वांगी, चवळी, गवार यासोबतच कलिंगडला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

या भागातील शेतकरी माजलगाव व परिसरातील आठवडे बाजारात जाऊन शेतीमालाची विक्री करतात. लॉकडाउनमुळे आठवडे बाजार बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांना मातीमोल भावात विक्री करीत आहेत. व्यापारी शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने माल खरेदी करून बाजारात चढ्या दराने विकत असल्याचे चित्र आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दाबला गेला असून, यंदा कोरोनामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे. झालेला खर्चदेखील निघत नसल्यामुळे मिळेल त्या भावात भाजीपाला विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी रामा भुंबे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com