चार वर्षानंतर माजलगावचा पाणी प्रश्‍न सुटला ! चार तासात उघडले धरणाचे 'एवढे' दरवाजे !     | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Majalgaon.jpg

माजलगावचे धरण चार वर्षानंतर फुल्ल झाले आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्‍न मिटला आहे. सलग चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणात पाणयाची आवक अतिशय वेगाने सुरु आहे. त्यामुळे रात्री एक दरवाजा उघडला. तर अवघ्या चार तासात आणखी चार दरवाजे खुले करण्यात आले. त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चार वर्षानंतर माजलगावचा पाणी प्रश्‍न सुटला ! चार तासात उघडले धरणाचे 'एवढे' दरवाजे !    

माजलगाव (जि. बीड) : माजलगाव धरण कार्यक्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरले असुन बुधवारी (ता.१६) रात्री दहा वाजता धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. तर गुरुवारी सकाळी उशीरा धरणाचे चार दरवाजे खुले करण्यात आले. एकूण पाच दरवाजे उघडण्यात आले असून सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे चार वर्षानंतर माजलगाव धरण फुल्ल झाले असून दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील पाणी संकट यंदा मिटणार आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
धरण कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या लघु व मध्यम प्रकल्पातून तसेच जायकवाडी धरणाच्या कालव्यातुन ४०० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परतीचा दमदार पाउस धरण कार्यक्षेत्रात मागील आठ ते दहा दिवसांपासून बरसत आहे. त्यामुळे माजलगाव धरण क्षमतेऐवढे भरले आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने बुधवारी (ता.१६) रात्री दहा वाजता धरणाचा एक दरवाजा तर रात्री उशिरा चार असे एकुण पाच ११, ६, १६, १० आणि बारा या क्रमांकाचे दरवाजे उघडून सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान धरण भरले असल्याने माजलगाव शहर, अकरा खेडे, बीड शहराचा पाणीप्रश्न तसेच तालुक्यातील शेतीसाठी सिंचानाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


धरण सद्यःपरिस्थिती
पाणीपातळी - ४३१.७५० मिटर.
एकुण साठा - ९८.७२ टक्के.
पाण्याची आवक - ६०५४ क्युसेक.
जायकवाडी पाणी आवक - ४०० क्युसेक.
एकुण पाउस - ७४९ मिमी.
आजचा पाउस - ०४ मिमी.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


सिंदफणा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अतिरिक्त पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावे लागत आहे. या सिंदफणा नदीपात्रालगतच्या गावांना व या भागातील लोकांना सावधानतेचा इशारा देउन सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असुन सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात सुरू आहे. धरण कार्यक्षेत्रात अधिक पाउस झाल्यास व पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने प्रसंगी आणखी दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. याची पूर नियंत्रण यंत्रणेने याची नोंद घ्यावी तसेच नदीपात्रालगत कोणीही विनाकारण जाउ नये.

- बी. आर. शेख, धरण अभियंता.

(संपादन-प्रताप अवचार)

टॅग्स :Beed