माजलगाव तालुक्यातील 'सांडस चिंचोली' नॉट रिचेबल, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

कमलेश जाब्रस 
Friday, 18 September 2020

  • सांडस चिंचोलीचा संपर्क तुटला.
  • मोरेश्वराचे मंदिर पाण्यात.
  • गोदावरी वाहतेय दुथडी भरून.

माजलगाव (जि.बीड) : जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सांडस चिंचोलीसह गोदावरी नदीपात्रालगतच्या अनेक गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला असून गंगामसला येथील मोरेश्वर गणपतीचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात परतीचा दमदार पाउस सुरू आहे. माजलगाव धरण कार्यक्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. जायकवाडीचे धरण अगोदरच भरलेले असल्याने व पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले आहेत. जवळपास एक लाख क्युसेक पेक्षा अधिक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिलेला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान सांडस चिंचोली गावातील पुलावरून पाणी जात असल्याने या गावासह गोदाकाठच्या अनेक गावांचा दळणवळणाचा संपर्क तुर्त तुटला आहे. तर सांडस चिंचोली गावाला पुर्ण पाण्याचा वेढा पडला आहे. तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर गणपतीचे मंदिर पाण्यात गेले आहे. दरम्यान माजलगाव धरणात मोठी आवक येत असल्याने धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले. ४२ हजार ९०७ क्युसेक वेगाने सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असुन धरणाची टक्केवारी ९९.७४ टक्के झाली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Majalgaon taluka heavy rains Sandus Chincholi gaon no contact