esakal | गळा व मानेवर चाकून वार करुन एकाचा खून, घनसावंगीजवळील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Ghansawangi Murder Incident

घनसावंगीपासून तीन किलोमीटर अंतरावरील मत्सोदरी सुतगिरणी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीचा गळा व मानेवर वार करुन खून झाल्याची घटना शनिवारी (ता.२८ ) पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान घडली.

गळा व मानेवर चाकून वार करुन एकाचा खून, घनसावंगीजवळील घटना

sakal_logo
By
सुभाष बिडे

घनसावंगी (जि.औरंगाबाद) : घनसावंगीपासून तीन किलोमीटर अंतरावरील मत्सोदरी सुतगिरणी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीचा गळा व मानेवर वार करुन खून झाल्याची घटना शनिवारी (ता.२८ ) पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान घडली. घनसावंगी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील मत्सोदरी सुतगिरणी ते बहिरेगाव या दरम्यान अंबड-घनसावंगी रस्त्यावरील पत्राच्या शेडमध्ये वास्तव्यास असलेले मारोती विश्‍वनाथ जाधव (वय ४०) हे शेळ्या सांभाळण्याचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या राहत्या घराच्या पत्राच्या बाजूला शेडमध्ये झोपले असता शनिवारी पहाटे अडीच  वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी गळ्यावर व मानेवर मारून व गळ्यात चाकूने वार करुन गंभीर जखमी करून खून केला.

यावेळी शेळ्याच्या आवाजाने व ओरडाओरडीनंतर घरातील पत्नी, मुले व मुले घराबाहेर आले असता मारोती जाधव रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने घटनेची माहिती घनसावंगी पोलिसांना दिली. घटनेची माहिती कळताच तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी अभय देशपांडे, पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

घटनेचा पंचनामा केला दरम्यान सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. जालना येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. त्याने रस्त्यापर्यंत माग काढला. दरम्यान मृत मारोती यांचा भाऊ रामदास विश्वनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने हे करित आहेत.  मृत मारोती यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे सध्या अद्याप तरी खुनाचे कारण निष्पन्न झाले नसले तरी या घटनेमुळे घनसावंगी परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image