सरकारी योजनांवर दलालांचा दबदबा

नेताजी दि. नलवडे 
सोमवार, 29 जानेवारी 2018

संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असलेल्या नागरीकाकडे संबधित अधिकारी दलालामार्फत पैशांची मागणी करत असल्याचा आरोप जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे यांनी केला आहे. 

वाशी (जि. उस्मानाबाद) - येथील तहसिल कार्यालयात दलालांचा वावर वाढलेला असून संजय गांधी निराधार योजना विभागातील अधिकारी गोर गरीब नागरीकांची पिळवणुक करत असून या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरीकाकडे संबधित अधिकारी दलालामार्फत पैशांची मागणी करत असल्याचा आरोप जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे यांनी केला आहे. सोमवारी (ता. २९) जाणीव संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी रामभाऊ लगाडे बोलत होते. विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसिलदार डॉ. संदिप राजपुरे यांना देण्यात आले.

यावेळी जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे लाल सलाम पँन्थरचे भाई बजरंग ताटे, जिल्हा अध्यक्ष मानवी हक्क अभियानच्या माया शिंदे, पोपट धुमाळ, हरिभाऊ क्षिरसागर, नवनाथ शिंदे, आप्पासाहेब सुकाळे, भिकाजी गरड, किरण लगाडे, भिमराव पवार यांच्यासह तालुक्यातील जेष्ठ नागरीक व महिला उपस्थित होत्या. जाणीव संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २९) तहसिल कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी पुढे बोलताना लगाडे म्हणाले, 'तहसिलदार डॉ. संदिप राजपुरे यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यात ओळख आहे. मात्र येथील संजय गांधी निराधार योजना विभागातील संबधित अधिकारी या योजनेशी संबधित नागरीकांना दलालामार्फत त्रास देत आहेत. त्यामुळे तहसिलदार यांनी संबधित अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी.'

यावेळी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

  • श्रावणबाळ सेवा योजना इंदिरागांधी आदी योजनेचे मानधन सहाशेवरुन दोन हजार रुपये करुन यासाठी २१ हजार रुपयांची असलेली अट रद्द करुन ६० हजार रुपये करावी.
  • या योजनेतील लाभार्थ्याचे रोखून धरलेली पेन्शन त्वरीत वाटप करावी.मागास वर्गिय विद्यार्थ्याची शैक्षणिक शिष्यवृत्ती ताबडतोब वाटप करावी.
  • शासकिय गायरान व वन विभागाच्या जमिनीवरील वहिती व असणाऱ्या पिकांचा पंचनामा करुन तलाठ्याकडील गाव नमुना १ ई च्या रजिस्टरमध्ये अतिक्रमीत जमिनीची नोंद करुन ती जमीन कसणाऱ्याच्या नावे करावी.

संजय गांधी निराधार योजनेतील अपंग लाभार्थ्याचे समाज कल्याण कडील असलेले प्रमाणपत्र धारकांना पेन्शन चालू ठेवा व शासनामार्फत त्याचे ऑनलाईन व्यवहार करावे.

आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या मोर्चामध्ये तालुक्यातील अनेक गावातून जेष्ठ नागरीक मोठ्या सहभागी झाले होते. प्रामुख्याने महिलांची संख्या लक्षणीय होती.

संबंधित बातम्या - 

Web Title: marathi news vashi marathwada news government schemes brokers