esakal | मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नशीबी पुन्हा 'आर्थिक आणीबाणी'  
sakal

बोलून बातमी शोधा

pani water.jpg

वर्षभर राबराब राबले, आता हाता तोंडाशी आलेला घास ही जोरदार झालेल्या पावसाने हिसकावून घेतला. कायमच आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांच्या नशीबी यंदाही मरणयातनाच आहे. पुन्हा त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अशीच भयावह परिस्थिती उमरगा तालुक्यातील शेतकरी वर्गावर आली आहे.  

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नशीबी पुन्हा 'आर्थिक आणीबाणी'  

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसाचा फटका हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाला बसला आहे. सीमावर्ती भागातील दगडधानोरा शिवारात कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास पन्नास शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय कवठा, डिग्गी, बेडगा, कुन्हाळी, कसगी, कलदेवलिंबाळा आदी भागातही सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उमरगा शहर व तालुक्यात यंदाच्या पावसाळा ऋतूत गेल्या दोन दिवसात मोठा पाऊस झाला आहे. १७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दगडधानोरा शिवारातील शेतात पाण्याचा महापुर शेतात आला. कर्नाटकातील उजळंब शिवारात मोठा पाऊस झाल्याने नाल्याचे पाणी शेतात शिरले आणि पाण्याने पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ऊस आणि केळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवाय शेतातील माती वाहून गेली असून शेताचे बंधारे, आरणी फुटल्या आहेत. परिणामी जमिनी नापिक झाल्या आहेत. नारंगवाडी, उमरगा, दाळींब, मुरूम व मुळज महसूल मंडळात मोठा पाऊस झाल्याने सोयाबीनचे नुकसान अधिक झाले असून दगडधानोरा, कवठा, माडज, कसगी, कुन्हाळी, कलदेवलिंबाळा आदी शिवारात सोयाबीनच्या क्षेत्रात पाणी थांबल्याने शेंगाला अंकूर फुटत आहे. दरम्यान मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या सोयाबिन पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.परंतू मिळणारी नुकसान भरपाई अधिक प्रमाणात असावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


" पावसाचा जोर वाढल्याने नाले, ओढ्यालगतच्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. दगडधानोरा क्षेत्रात सोयाबिनचे सर्वाधिक नुकसान आहे, या भागासह अन्य भागातील पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. - सुनिलकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी

" यंदाचा खरिप हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा आहे. पेरणीपासून किड, अळी व रोगराई दुर करण्यासाठी करावी लागलेली मेहनत पावसाच्या एका मोठ्या तडाक्यात वाया गेली आहे. सोयाबीनसह बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. भरपाई तुटपुंजी मिळेल मात्र तूर्त हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने मनाला वेदना होत आहेत. 
- संतोष पाटील, शेतकरी दगडधानोरा

(संपादन-प्रताप अवचार)