नुकसान भरपूर आहे, पण खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी! 

राम काळगे
Sunday, 18 October 2020

  • मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची ग्वाही. 
  • निटूर ता. निलंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. 
  • पाणंद रस्ता, सोयाबिन नुकसानीसाठी त्वरीत मदत करा, शेतकर्यांनी दिले निवेदन 

निलंगा (लातूर) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी बांधवांनो तुम्ही खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. लवकरात लवकर मदत केली जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी (ता.18) निटूर (ता.निलंगा) येथील शेतकऱ्यांना दिली. शिवाय केंद्राच्या पथकाकडून त्वरीत पाहणी करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मंत्री विजय वडेट्टीवार लातूर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी निटूर (ता.निलंगा) येथील नुकसान झालेल्या पीकांची पाहणी करुन शेतकर्यांशी संवाद साधला. वडेट्टीवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत खचून जाऊ नये, काढून ठेवलेले खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आपण सर्वांना उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे. हे मान्य आहे. यासाठी सरकार सर्वोतेपरी तयारीला लागले आहे. केंद्रीय पथकाकडून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याची गरज आहे. याबाबत केंद्राकडे पत्र पाठविण्यात आले असून आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे न भरून येणारे नुकसान झाले असून राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. आताच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहण्याची वेळ असून केंद्राच्या पाहणीनंतर राज्य सरकार झालेल्या नुकसानीचा संपूर्ण अहवाल केंद्राकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी आमदार धीरज देशमुख, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे युवा नेते अभय सोळूंके, प्रभाकर बंडगर, उपविभागीय आधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास आधिकारी अमोल ताकभाते, कृषीअधिकारी राजेंद्र काळे यासह आदीजण उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सरसकट मदत करावी, निवेदन दिले 
निटुर ता. निलंगा येथे माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ, दिलीप हुलसुरे, राजाभाऊ सोनी, अनिल सोमवंशी, नूर पटेल यासह आदी शेतकऱ्यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले. निवेदनात शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून मदत करावी, अतिवृष्टीमुळे गावातील अंतर्गत रस्ते व शेताला जाणारे पानंद रस्त्याची नुकसान झाले आहे. या रस्ता दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा. शेतकऱ्यांना सोयाबीनचे नुकसान भरपाई देण्यात यावी. यासह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada tour of Vijay Vaddetiwar