लातूर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार, पाच जणांना अटक

हरी तुगावकर
Wednesday, 23 December 2020

लातूर  येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिली.

लातूर : येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिली. पीडित मुलगी ही तीच्या आजीला दुकानात जाऊन येते म्हणून घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला पण मिळून आली नव्हती. तिला कोणी तरी पळवून नेल्याची तक्रार तिच्या चुलत्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास करून या मुलीचा शोध घेतला असता तिचे अपहरण करून बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे, असे श्री. सांगळे म्हणाले.

 

श्री. सांगळे यांनी सांगितले की, यात ही मुलगी ज्या ठिकाणी राहत होती. त्या घराजवळ असलेल्या प्लॉटवर एक अल्पवयीन मुलगा येत होता. तो तेथे नेहमी येजा करीत असे. यातून त्याची या मुलीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेम संबंध जुळले. आई-वडील नीट बोलत नसल्याने आपण पळून जावू असे ही मुलगी या मुलाला सातत्याने म्हणत होती. ता. दहा डिसेंबरला ही मुलगी या मुलाच्या वसवाडी येथील घरी गेली. तेथे या मुलाची आई राधा विजयकुमार भिंगे हिच्याशी या मुलीची भेट झाली. आपण पळून आल्याचेही तिने सांगितले. दोन दिवस ही मुलगी तेथेच राहिली.

ता. १२ डिसेंबरला सपना नावाच्या महिलेने या मुलीला पांगरी येथील सांस्कृतिक कला केंद्रावर नेले. दोन दिवस तेथे ही मुलगी राहिली. त्यानंतर ता. १४ डिसेंबरला या मुलीला परत वसवाडी येथे राधा भिंगे हिच्या आणून सोडण्यात आले. त्यानंतर राधा भिंगे हिने या मुलीला अंबाजोगाई येथील शफीक याच्यासोबत दुचाकीवर अंबाजोगाई येथे पाठवले. तेथे या मुलीवर दोघांनी बलात्कार केला, असा जवाब या मुलीने दिला आहे.

 

 

त्यानंतर पोलिसांनी तपास करून संशयित आरोपी सपना सोमनाथ अंधारे (वय ३२, रा. पिंजरा सांस्कृतिक केंद्र, आळणी फाटा, ता. उस्मानाबाद), संतोष पोपट मुंडे (वय ३६, रा. शिवाजीनगर, येडशी, ता. उस्मानबाद), शफिक शैकत शेख (वय २४, रा. वाकद, ता. रिसोड, जि. वाशीम), ऋषिकेश रमेश सूर्यवंशी (वय २०, रा. खडकपुरा काळा मारुती, ता. अंबाजोगाई), वसीम जाफर सय्यद (वय २८, रा. प्रशांतनगर अंबाजोगाई) यास अटक करण्यात आल्याची माहिती श्री. सांगळे यांनी दिली. या प्रकरणातील राधा भिंगे ही फरार असून, तिचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor Girl Assaulted In Latur, Five Arrested