esakal | सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, बीडमधील घटना!
sakal

बोलून बातमी शोधा

beed Sucide.jpg

दोन हजार रुपयांचे दोन वर्षात झाले २८ हजार 

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, बीडमधील घटना!

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या दोन हजार रुपयांचे सावकाराने व्याजासकट २८ हजार केले. त्यानंतर या रकमेचा तगादा लावत त्या शेतकऱ्याला मारहाण करून अपमानित केले. सावकाराच्या सततच्या तगाद्याला, मारहाणीला आणि मानहानीला कंटाळलेल्या त्या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. ११) तालुक्यातील राजुरी (नवगण) येथे उघडकीस आली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गंगाराम विश्वनाथ गावडे (रा. राजुरी नवगण, ता. बीड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गावातीलच खासगी सावकार लाला ऊर्फ युवराज पांडुरंग बहीर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. परिसरातील नवगण राजुरी येथील शेती आणि ऊसतोडणीवर गुजराण करणाऱ्या गंगाराम गावडे यांनी दोन वर्षांपूर्वी अडचणीसाठी गावातीलच लाला ऊर्फ युवराज बहीर याच्याकडून दोन हजार रुपये दहा टक्के प्रतिमहिना व्याजाने घेतले. या रकमेची परतफेड करूनही सावकाराने दोन हजारांची रक्कम दोन वर्षातच व्याजासकट २८ हजार केली आणि त्यासाठी गंगारामच्या मागे तगादा सुरू केला. मारहाणीच्या धमक्या मिळू लागल्याने गंगाराम तणावाखाली होते. शुक्रवारी (ता. नऊ) सावकार युवराज बहीरने गंगरामच्या घरी जाऊन पुन्हा धमक्या दिल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता त्याने गंगारामला शेतात बोलावून घेतले. गंगारामची दुचाकी (एमएच २३ एस ९८३९) ठेवून घेत त्याने गंगारामला मारहाण करून कपडे फाडले. पुतण्याने दिलेले कपडे घालून गंगारामने कसेबसे घर गाठले. त्यानंतर ते प्रचंड तणावात होते. पत्नीने समजूत घालूनही काही फरक पडला नाही. अखेर रविवारी पहाटे ३ वाजता गंगाराम यांनी घराजवळीलच चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी सर्व हकिगत त्यांची पत्नी आशाबाई यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली. या प्रकरणी सावकार बहीर याच्यावर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेनंतर संशयित आरोपी सावकार फरार झाला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लिहिली मृत्युपूर्व चिठ्ठी 
गंगाराम यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात त्यांनी पैसे परत करूनही सावकाराने अधिक रकमेची मागणी करत केलेल्या छळाबद्दल सविस्तर लिहिले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)