संतापजनक : तेराव्या वर्षीच केला प्रेमविवाह, बाळ झाल्यावर...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

  • आईनेच संपवले पोटच्या गोळ्याला 
  • अंबडमध्ये तीन महिन्यांच्या बाळाला बुडवले टाकीत 

अंबड (जि. जालना) - शहरातील आंबेडकरनगर येथे सोमवारी (ता. २५) पहाटे एक ते तीनच्या दरम्यान एका तीन महिन्यांच्या चिमुकल्याची त्याच्या आईनेच पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे कुणीतरी अनोळखी व्यक्तीने बाळाला ठार केल्याची तक्रार स्वतः या निर्दयी मातेने दिली होती. 

शहरातील आंबेडकरनगर येथील विजय जाधव हे पत्नी पायल, आई, मुलगी आणि तीन महिन्यांच्या बाळासह राहतात. रविवारी रात्री सर्व कुटुंबीय अंगणात झोपले. दरम्यान, पायलने तिच्या तीन महिन्यांच्या मुलाला रात्री एक वाजता दूध पाजून घरातील खोलीत  पलंगाला बांधलेल्या झोक्यात झोपवले. वाढत्या उष्णतेमुळे तीही कुटुंबातील इतर सदस्यांसोबत अंगणात झोपायला गेली. बाळ एकटेच घरात होते.

झोपण्यापूर्वी जाधव कुटुंबीयांनी घराच्या वाड्याचा मुख्य दरवाजा बंद केलेला होता. दरम्यान, बाळ ज्या खोलीत झोपलेले होते त्या खोलीचा दरवाजा आणि खिडकी हवा यावी म्हणून उघडी ठेवलेली होती. मध्यरात्री जेव्हा कुटुंबातील एका सदस्याला जाग आली तेव्हा वाड्याचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी खोलीत जाऊन पाहिले असता बाळ झोळीत नव्हते. त्याचा शोध घेतला असता अंगणात ठेवलेल्या वाड्यातील पाण्याच्या टाकीत ते मृतावस्थेत दिसले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. 
 

संबंधित बातमी - जालना : सैतानालाही वाटेल लाज, अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचा खून

माता न तू वैरिणी... 
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान, मृत बाळाची आई पायल हिने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, बाळाला कुणीतरी बुडून मारल्याचा आरोप तिने केला. पण, पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. पायलला पोलिसी खाक्या दाखवताच हे कृत्य आपणच केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
वयाच्या तेराव्या वर्षीच पायलचा प्रेमविवाह 
पायल जेव्हा १३ वर्षांची होती तेव्हा विजय जाधवसोबत पाच वर्षांपूर्वी तिचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. घरात सासूबरोबर तिची नेहमीच कुरबूर होत असे. पायल हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, सासू शेजारी-पाजारी यांच्याशी बोलताना म्हणत असे की, नातू मोठा झाल्यानंतर हिला घराच्या बाहेर हाकलून देऊ. आपल्याला हाकलून देण्याअगोदरच पायलने तीन महिन्यांच्या पोटच्या मुलाचा खून केला. तसेच तिने पती विजय जाधव यांना मोबाईलवरून मुलाला इकडे-तिकडे पाहू नका तर अंगणाच्या पाण्याच्या टाकीतच पाहा, असे सांगितले. हाच धागा पकडून अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सी. डी. शेवगण व पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी कसून चौकशी केली. त्यातच पायलने खुनाची कबुली दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother kills 3-month-old baby, dumps in Water at Jalna