जालना : सैतानालाही वाटेल लाज, अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचा खून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

जालना जिल्ह्यातील अंबड येथील धक्कादायक घटना 

अंबड (जि. जालना) - शहरातील आंबेडकरनगर येथे सोमवारी (ता. २५) पहाटे एक ते तीनच्या दरम्यान एका तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह अंगणात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत आढळला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचा कुणी तरी खून केला, असा संशय आईने व्यक्त केला. या क्रूर घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

शहरातील आंबेडकरनगर येथील विजय जाधव हे पत्नी पायल, आई, मुलगी आणि तीन महिन्यांच्या बाळासह राहतात. रविवारी रात्री सर्व कुटुंबीय अंगणात झोपले. दरम्यान, पायल यांनी त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलाला रात्री एक वाजता दूध पाजून घरातील खोलीत  पलंगाला बांधलेल्या झोक्यात झोपवले. वाढत्या उष्णतेमुळे त्याही कुटुंबातील इतर सदस्यांसोबत अंगणात झोपायला गेल्या. बाळ एकटेच घरात होते. झोपण्यापूर्वी जाधव कुटुंबीयांनी
घराच्या वाड्याचा मुख्य दरवाजा बंद केलेला होता.

दरम्यान, बाळ ज्या खोलीत झोपलेले होते त्या खोलीचा दरवाजा आणि खिडकी हवा यावी म्हणून उघडी ठेवलेली होती. मध्यरात्री जेव्हा कुटुंबातील एका सदस्याला जाग आली तेव्हा वाड्याचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी खोलीत जाऊन पाहिले असता बाळ झोळीत नव्हते. त्याचा शोध घेतला असता अंगणात ठेवलेल्या वाड्यातील पाण्याच्या टाकीत कुणीतरी बाळाला टाकून त्याचा खून केल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बाळाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, अंबड पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भारत बलैया करीत आहेत. 
 
त्याने कुणाचे काय बिघडवले?
ज्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडून ठार केले त्याचे वय अवघे तीन महिने आहे. हे जग काय आहे, हेही त्याला अजून कळाले नव्हते. केवळ दूध पिणे आणि आईच्या कुशीत विसावणे हेच काय त्याचे विश्व होते. त्यामुळे या बाळाने कुणाचे काय बिघडवले की त्याचा खूनच करावा लागला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून, या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात
आहे. 

सर्वांनाच धक्का : सहा दिवसांपूर्वी झाले लग्न, आता नववधू...

महिलेची पोत हिसकावली 
अंबड, ता. २५ (बातमीदार) :
गोलापांगरी येथे अंगणात झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अनोळखी चोराने हिसकावून नेली. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.  गोलापांगरी येथे रविवारी (ता. २४) हे आसाराम शेळके हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह रात्री अंगणात झोपले होते. त्यांच्या कुटुंबातील एका महिलेच्या गळ्यातील वीस हजार रुपये
किमतीची सोन्याची पोत कुणीतरी पळविली. यावेळी महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोराने महिलेचे तोंड दाबले होते. चोराने पळ काढल्यानंतर महिलेने आवाज देऊन मुलाला जागे केल्यानंतर शेजारी मदतीला धावले होते; मात्र तोपर्यंत चोर पळून गेला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a three-month-old baby At Ambad