लातूर : त्याने केला बहिणीच्या पतीचा खून, कारण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

कोळी याने दिनकर याला दोन चापटा मारल्या. याचा राग मनात धरून दिनकरने कोळी याच्या गळ्यावर कत्तीने वार करून त्याचा खून केला.

मदनसुरी (जि. लातूर) - नदी हत्तरगा (ता. निलंगा) येथे मेहुण्यानेच बहिणीच्या पतीचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) सकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, की रमेश कोळी (वय 38, रा. माकणी, ता. लोहारा) याला दिनकर तिप्पनबोने (रा. नदी हत्तरगा) याने तू आणि तुझी पत्नी माझ्या आई-वडिलांकडून पैसे का नेता असे म्हणत शिवीगाळ केली
होती. यावर कोळी याने दिनकर याला दोन चापटा मारल्या. याचा राग मनात धरून दिनकरने कोळी याच्या गळ्यावर कत्तीने वार करून त्याचा खून केला. मृताचा मुलगा राहुल कोळी याच्या फिर्यादीवरून कासारशिरशी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रताप गर्जे करीत आहेत. 

अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार 
औरंगाबाद :
दुचाकी अपघातात सव्वीसवर्षीय तरुण ठार झाला. ही घटना बुधवारी (ता. चार) रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास वसंतराव नाईक चौक (सिडको चौक) ते एपीआय कॉर्नरदरम्यान घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अक्षय रमाकांत निकम (वय 26, रा. एसटी कॉलनी, सिडको एन- दोन) असे मृताचे नाव आहे. अक्षय हा एमआयडीसी सिडको
भागातील एका कंपनीत नोकरीला होता.

हेही वाचा : अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे आयुष्यावर दरोडा! 

तो कॅनॉट प्लेसमधून दुचाकीने घरी जात होता. सिडको चौकातून एपीआय कॉर्नरकडे जाताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. यात तो कोसळून त्याच्या छाती व पोटाला दुखापत झाली. घटनेनंतर नागरिक जमा झाले. त्यांनी जवळच्या रुग्णालयात अक्षयला दाखल केले. प्रकृती गंभीर बनल्याने त्याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार सुभाष चव्हाण करीत आहेत. 

जाणून घ्या - लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा.. 
 

दुचाकीच्या धडकेत डॉक्‍टर दांपत्य जखमी 
औरंगाबाद :
दुचाकीची धडक बसल्याने मोपेड दुचाकीस्वार डॉक्‍टर दांपत्य जखमी झाले. हा अपघात चार डिसेंबरला सकाळी सिद्धार्थ चौक, सिडको एन- सहा साईनगर येथे घडला. याबाबत डॉ. निखिल गोविंदसिंग राजपूत (वय 35, रा. साईनगर, सिडको) यांनी तक्रार दिली. ते व त्यांच्या पत्नी डॉ. माधुरी राजपूत मोपेड दुचाकीने जाताना बजरंग चौकाकडून येणाऱ्या संदीप पाटील (रा. सिडको एन- सात) यांची दुचाकी त्यांना धडकली. यात डॉक्‍टर दांपत्य जखमी झाले व दुचाकीचे दहा हजारांचे नुकसान झाले. अशा तक्रारीनुसार याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

काय होईल - बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? जाणून घ्या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of Sister's husband At Nadi Hattarga Ta Nilanga