निलंग्यात दोन टप्प्यात 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहीम, सर्वेक्षणातून ६६ पॉझिटिव्ह

corona young.jpg
corona young.jpg

निलंगा (लातूर) : तालुक्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी (दि.१५ सप्टेंबर ते २४ ऑक्‍टोबर) या कालावधीत माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी भेट देणाऱ्या प्रशासन व आरोग्य विभागाच्या तपासणी पथकास माहिती देऊन सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार गणेश जाधव यांनी केले आहे. निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  श्रीनिवास कदम, डॉ. काळे यांची उपस्थित होते.

तहसीलदार गणेश जाधव म्हणाले की, या मोहिमेपूर्वी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेवरून शहरी व ग्रामीण भागातील पन्नास वर्षाच्या पुढील व्यक्तींची तपासणी घरोघरी जाऊन करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी म्हणजेच शून्य मृत्यूदर करण्यासाठी शासनाच्या आदेशावरून १५ सप्टेंबर ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर व १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान आरोग्य विभागाचे पथक घरोघरी भेटी देऊन थर्मलगनच्या साह्याने ताप व पल्स ऑक्सीमिटरच्या साह्याने ऑक्सिजन लेव्हलचे तपासणी करून कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची व त्यासोबतच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासह गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करीत आहे. कोरोनाच्या आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहेत. 

शहर व ग्रामीण भाग मिळून २८० पथके 

यासाठी शहरी भागात १० व ग्रामीण भागात २७० असे एकूण २८० तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली असून यामार्फत शहरातील ७,२२६ घरांपैकी ६,०१३ व ग्रामीण भागातील ५२ हजार ८७४ घरांपैकी ४४ हजार ३९८ घरातील व्यक्तींची पहिल्या फेरीत तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेत शहरी भागात ८१३ व ग्रामीण भागात ६७८१ मधुमेह, दमा ,रक्तदाब यासारखे गंभीर आजार असणारे असे सात हजार ५९४ रुग्ण आढळून आले आहेत.

सर्वेक्षणातून ६६ जण पॉझिटिव्ह

कोरोना आजार सदृश्य लक्षणे असणाऱ्या शहरी भागातील २६ व ग्रामीण भागातील २४३ व्यक्तींची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत शहरी भागात वीस व ग्रामीण भागात ४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व या कोरोणा आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वैयक्तिक व संस्था या दोन स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार जाधव यांनी यावेळी केले. याप्रसंगी डॉक्टर सौंदळे व डॉक्टर कदम यांनी तालुक्यातील कोरोना आजाराबाबतचे सध्याची माहिती आकडेवारीसह सांगितले.


(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com