
संभ्रम करून घेण्यासारखे कांहीही नाही औशाचा सर्वे वेगळा असल्याचा केला खुलासा
औसा (लातूर) : औशाची रेल्वे निलंगामार्गे वळविल्याचा संभ्रम निर्माण होत असून औशाचा रेल्वेमार्ग पिंकबुकात नोंदला गेलाय तो कुठेही जाणार नाही. औशाची रेल्वे ही औसा मार्गेच धावेल हे माझे वचन आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले आहे त्याच प्रमाणे रेल्वेचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन काम केले जाणार असून फक्त निलंगाच माझा मतदारसंघ नाही तर संपूर्ण लातूर जिल्हा माझा मतदारसंघ आहे. लातूर जिल्हा संपूर्ण देशाशी कसा जोडला जाईल हे आम्ही पाहत असतांना विनाकारण गैरसमज होत असल्याच्या प्रतिक्रिया माजी पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सकाळशी बोलतांना दिली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
रेल्वे संदर्भात प्रथमच त्यांनी हे भाष्य केले आहे.
लातूर रोड ते निलंगामार्गे उमरगा आणि पुढे आळंद - गुलबर्गा असा नुकताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांना साकडे घालत लातूर-औसा-लामजना- उमरगा-आळंद- गुलबर्गा हा रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. दरम्यान या मार्गाची नोंद रेल्वेच्या पिंकबुकात होऊनही अनेक कारणांमुळे हा प्रश्न अडगळीलाच पडला मात्र लातूररोड वरून होणारा रेल्वेमार्ग औशाचा असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि मग राजकीय वातावरण तापले. ही रेल्वे निलंग्यातून वळविण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप करण्यात येऊ लागला. त्यावर आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी औशाची रेल्वे औशातूनच धावणार असल्याचे वचनच दिले.
केवळ औसाच नाही तर रेणापूर-परळी, लातूररोड-लातूर, उदगीर-गुलबर्गा, लातूर-अजमेर, उदगीर-तिरुपती या नवीन मार्गाची मागणी करीत लातूर जिल्हा देशाला रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत; लातूर-औसा-तुळजापूर-सोलापूर-पंढरपूर-कोल्हापूर असाही रेल्वेमार्ग मागण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठी क्रांती घडत असतांना केवळ औसा आणि निलंगाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला रेल्वेट्रॅकवर आणायचे आहे. कारण जिल्हा माझा मतदार संघ आहे आणि मी जिल्ह्यासाठीच काम करीत असून मी संकुचित दृष्टीने कुठलेही काम करीत नाही आणि ते कोणीही करू नये जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन काम करू असा विश्वास देतांना लातूर स्टेशन आणि लातूररोड जंक्शन हे रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात मोडत असल्याने ही दोन्ही प्रक्रिया वेगळ्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
निलंग्यातून जाणाऱ्या रेल्वेचे सर्वेक्षण झाले नसून हे फक्त रेल्वेला हा मार्ग पोषक आहे का? या मार्गवर व्यापार आणि प्रवासी यांना काय फायदा होईल हे पहिले असल्याचा खुलासाही त्यांनी केला. माजी खासदार सुनील गायकवाड यांनीही सांगीतला औशातून जाणाराच मार्ग दरम्यान माजी खासदार सुनील गायकवाड यांनी औशात सोमवारी (ता.३०) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन २०१७ मध्ये त्यांनी औशातून गुलबर्गा जाणारा रेल्वेमार्ग मंजूर करावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे पत्र दाखवून हा मार्ग औशातूनच जावा अशी मागणीही केली. आता औसा शहरात रेल्वे संघर्ष समितीची स्थापना झाली असून ही रेल्वे औशातूनच जावी अशी ठाम भूमिका या संघर्ष समितीने घेतली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही आपली ताकत लावत थेट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाच साकडे घातले आहे. जर निलंग्याला रेल्वे न्यायची असेल तर औसा-लामजना-निलंगा-कासार सिरशी-उमरगा अशी मंजूर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांनी निलंगा तालुक्यातील औसा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावाला भेटी देत वरील मार्गाची आमची मागणी असल्यामुळे तुमच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. थंडीच्या कडाक्यातही सध्या औसा आणि निलंगा तालुक्यात वातावरण मात्र रेल्वेने राजकारण तापविले आहे हे मात्र नक्की.