esakal | जालना जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र बंद होण्यास सुरवात, खुल्या मार्केटमध्ये अधिक भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Soybean, Moong

दरवर्षी नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन, मुग, उडीद विक्रीसाठी मोठी गर्दी करत असतात.

जालना जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र बंद होण्यास सुरवात, खुल्या मार्केटमध्ये अधिक भाव

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : दरवर्षी नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन, मुग, उडीद विक्रीसाठी मोठी गर्दी करत असतात. मात्र, यंदा खरीप पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पन्नात घट झाली. त्यामुळे खुल्या मार्केटमध्ये उडीद, मुग, सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाल्याने यंदा नाफेडकडे एक क्विंटल ही खरेदी झाली नाही. परिणामी शेतमाल खरेदी न करताच नाफेडचे खरेदी केंद्र बंद होण्यास सुरवात झाली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनला दरवर्षी हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाफेडच्या खरेदीकडे डोळे लावून बसलेला असतो. यंदा ही जालना जिल्ह्यात नाफेडकडून जालना, अंबड, तीर्थपुरी, मंठा, भोकरदन, परतूर व सातोना या सात ठिकाणी मुग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, मुग, उडीद पाण्याखाली गेले. तर अनेक ठिकाणी उभ्या पिकांना कोंब फुटले.

त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाली. दुसरीकडे अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन, मुग, उडीद पिकांची प्रतवारीही खालावली. त्यामुळे सोयाबीन, मुग, उडीद विक्री करताना नाफेडच्या नियमांचा डोंगर पार करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. तर दुसरीकडे मुग, उडीद, सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने या पिकांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. परिणामी नाफेडच्या खरेदी केंद्रावर एक क्विंटल ही सोयाबीन, उडीद, मुग खरेदी झाली नाही. त्यामुळे खरेदी न करताच ता. १६ डिसेंबरपासून नाफेडने मुग खरेदी केंद्र बंद केले आहे. तर ता. २४ डिसेंबरपासून सोयाबीन खरेदी केंद्र बंद केले जाणार आहे. तसेच ता. २६ डिसेंबरपासून उडीद खरेदी केंद्र ही नाफेडकडून बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान शेतमाल खरेदी न करताच नाफेडला खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे.

खुल्या बाजारामध्ये मुग, उडीद, सोयाबीनला यंदा हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही खरेदी केंद्रावर शेतमाल घेऊन आले नाहीत. शासनाच्या नियमांप्रमाणे ता. १६ डिसेंबरपासून मुग खरेदी बंद केली आहे. ता.२४ डिसेंबरपासून सोयाबीन तर ता. २६ डिसेंबरपासून उडीद खरेदी बंद करण्यात येणार आहे.
- विमल वाघमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जालना.
 

Edited - Ganesh Pitekar

loading image