आधी गंजी पेटविली, नंतर दोन एकरातील मेथी जाळली, नायगावात दहशत   

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020


शेतकऱ्याचे नुकसान ः उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव शिवारात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंधरा दिवसांआधी सोयाबिन शेतीची गंजी पेटविली. आणि त्याच शेतकरी बांधवाची दोन एकरातील मेथीही तणनाशक मारुन जाळुन टाकली. त्यामुळे दहशत पसरली आहे. 

नायगाव (उस्मानाबाद) : येथील शेतकरी विश्वनाथ मस्के यांच्या शेतातील काढणीला अलेल्या मेथीवर अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (ता. २९) मध्यरात्री तणनाशक फवारल्याने दोन एकरावरील मेथी जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही याच शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजी (चार ते पाच लाख रुपयांच्या), ठिबक सिंचन संच, ऊस तसेच कडबा जाळला आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना अद्याप माथेफिरू सापडू शकलेला हे विशेष. गावातील एका व्यक्तीचा यात हात असल्याचा संशय असून, पोलिसांचे पाठबळ त्या व्यक्तीला मिळत असल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
येथील विश्वनाथ शंकर मस्के यांनी गट नंबर ५१९ मध्ये दोन एकर क्षेत्रावर मेथीची पेरणी केली होती. ती व्यापाऱ्याला दोन लाख रुपयांना विकली होती. व्यापारी मेथी घेऊन जाण्याच्या आधीच गुरुवारी (ता. २९) मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मेथीवर तणनाशक फवारल्याने मेथी जळून गेली आहे. गेल्या महिन्यातही १९ सप्टेंबरला मध्यरात्री मस्के यांनी गट ४९९, ५१९ मधील काढणी करून ठेवलेल्या दोन सोयाबीनच्या गंजी पेटवून दिल्या होत्या. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वारंवार कृत्य 
विश्वनाथ मस्के यांच्या शेतातील याआधी ठिबक सिंचन, कडब्याची गंज, ऊस, सोयाबीनच्या गंजी जाळल्या आहेत. या कृत्याबाबत शिरढोण (ता. कळंब) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पण, आरोपी सापडले नसल्याने ते पुन्हा-पुन्हा हे कृत्य करीत असल्याचे श्री. मस्के यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वारंवार असे प्रकार होत असताना आरोपी सापडत नसल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naigaon farmers Loss killed herbicides on two acres of fenugreek