नांदेडला किराणा घरपोच मिळणार, काळजी करु नका...

अभय कुळकजाईकर
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनामुळे संचारबंदी असून नागरिकांना किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. मोबाईलद्वारे घरपोच किराणा सामान पोहचविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून त्या त्या क्षेत्रीय कार्यालयातील दुकानांची नावे आणि मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. 

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे संचारबंदीत कुणीही रस्त्यावर येऊ नये, यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. नांदेड शहरातील त्या त्या क्षेत्रीय कार्यालयातंर्गत असलेल्या दुकानांची नावे आणि मोबाईल क्रमांक दिला असून त्याद्वारे घरपोच किराणा मिळणार आहे.
 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. या परिस्थितीत लोकांनी एकत्र जमणे टाळावे यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यातच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू या वेळेत खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसत आहे. बाजारात दूध, भाजी व किराणा घेण्यासाठी लोकांची गर्दी होत असल्यामुळे त्यांना घरपोच दूध, किराणा व भाजीपाला पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोना संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण त्याचबरोबर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकतीच घेतली. पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासोबत चर्चा केली तर खासदार चिखलीकर यांनी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. 

हे ही वाचा - दहा हजाराची लाख घेताना  परिक्षण भूमापकास अटक

किराणा मिळणार घरपोच
जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. विपीन यांनी महापालिकेतील अधिकारी आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात नागरिकांना संचारबंदीच्या काळात घरपोच किराणा मिळण्यासाठीच्या सूचना केल्या. किराणा दुकानदारांनी स्वयंसेवी व इच्छुक मुले यांच्यामार्फत घरपोच धान्य देण्यात यावे. दुकानासममोर त्यांनी फलक लावावेत. किराणा दुकाने २४ तास चालू ठेवता येतील. ग्राहकांची यादी असेल तर त्यांना फोनद्वारे सामानाची यादी मागवून घेऊन त्यांना वेळ ठरवून देऊन सामान घेऊन जाण्यास सांगण्यात यावे. घरपोच आवश्यक साहित्य देण्यात यावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. महापालिकेने घरपोच किराणा सामान देणाऱ्या दुकानांची व मोबाईल क्रमांकाची यादी प्रसिद्ध केली असल्याची माहिती उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली आहे. 

गरजूंची जेवणाची व्यवस्था
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत अंतर्गत रोजंदारांची जेवणाची व्यवस्था स्वंवयेवी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, आमदार, नगरसेवक यांच्या मदतीने गरजू नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था काही मदत घेवून अन्नदान व इतर मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हे ही वाचलेच पाहिजे - ‘लॉकडाऊन’ने चिमुकला दुरावला आई -वडीलांपासून

किराणा घरापर्यंत येणार 
गर्दी टाळण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी सकाळी किंवा संध्याकाळी बाजारात येऊन गर्दी करू नये. अत्यावश्यक कामाशिवाय शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. तुमच्या घरापर्यंत किराणा सामान देण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. विपीन यांनी दिली. त्यांच्या सूचनेनुसार उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत किराणा दुकानांची यादी तसेच मोबाईल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. नांदेडला भाजीपाला बाजार, किराणा दुकान या ठिकाणी गर्दी न करता आवश्यक अंतर ठेवण्यासाठी महसूल व पोलीस अधिकारी यांना मदत करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded to get groceries, don't worry ...