'पवारांनी जेवढी विमानतळे बनवली, तेवढे बसस्टॉप त्यांच्याकडे नाहीत'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

जोपर्यंत महाराष्ट्रातील आम्ही सर्व तरूण कार्यकर्ते पवार साहेबांसोबत आहोत, तोपर्यंत राष्ट्रवादीला कोणीही संपवू शकत नाही.

औरंगाबाद : विधानसभेची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष यात्रा, जाहीर सभा आणि मेळावे यांचे आयोजन करत आहेत. 

अनेक मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात गेल्याने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सगळी सूत्रे स्वत:च्या हाती घेतली. सध्या ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे बोलावण्यात येत आहेत. त्यांच्यासोबत पक्षातील अनेक महत्त्वाची नेते मंडळी या मेळाव्यात सहभागी होत आहे. शुक्रवारी (ता.20) औरंगाबाद येथे आयोजित मेळाव्यात बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. 

गेल्या आठवड्यात सोलापूर येथे महाजनादेश यात्रेनिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अमित शहा यांनी 'शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, ते सांगावं?' असा प्रश्न उपस्थित केला होता. अमित शहांना प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, 'पवार साहेबांनी महाराष्ट्रात जेवढी विमानतळे तयार केली आहेत तेवढी बसस्थानके अमित शहा तुमच्या अख्ख्या गुजरातमध्ये नाहीत.'

सोलापूरात बोलताना अमित शहा यांनी म्हटले होते की, जर भाजपने आपले सर्व दरवाजे उघडले, तर राष्ट्रवादी पक्षात पवारांव्यतिरिक्त कुणीच शिल्लक राहणार नाही.' याचा समाचार घेताना मुंडे म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्रातील आम्ही सर्व तरूण कार्यकर्ते पवार साहेबांसोबत आहोत, तोपर्यंत राष्ट्रवादीला कोणीही संपवू शकत नाही. आणि अमित शहांनी पवारांना महाराष्ट्रातून संपवण्याचा विचारदेखील करू नये,' असा इशाराही मुंडे यांनी दिला.

- सायकलची मोटरसायकल बनविण्याचा नादखुळा छंद!

- Vidhan Sabha 2019 : विधानसभा प्रचारास मिळणार अवघे बारा दिवस

- बेन स्टोक्सच्या लहानपणी घडलेली धक्कादायक घटना उघड; भडकला तो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Dhananjay Munde criticized on BJP President Amit Shah