Coronavirus - बीड जिल्ह्यात आता नव्या तिघांसह फक्त दहा कोरोनाग्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

  • आणखी चौघांसह ११५ कोरोनामुक्त 
  • बीड शहरात आढळले तीन रुग्ण 
  • वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाची करणार कोरोना चाचणी 

बीड - योग्य उपचारानंतर बुधवारी (ता. एक) आणखी चौघांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले. आतापर्यंत ११५ लोकांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. दरम्यान, बुधवारी आढळलेल्या तीन कोरोनाग्रस्तांसह आजघडीला जिल्ह्यात फक्त दहा कोरोनाग्रस्त आहेत. 

जिल्हा रुग्णालयातून बुधवारी १४, बीड कोविड केअर सेंटरमधून नऊ, आष्टी ग्रामीण रुग्णालयातून १२, केज व परळी उपजिल्हा रुग्णालयातून प्रत्येकी दोन, अंबाजोगाईच्या कोविड केअर सेंटरमधून १० व स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून पाच असे ५४ थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले. या स्वॅबची अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणी झाली. यामध्ये 
यात तीन स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह तर दोन स्वॅब नाकारले असून, एकाचा अहवाल अनिर्णीत राहिला. यात आढळलेले तीन रुग्ण हे बीड शहरातील अजीजपुरा, जुना बाजार व कारंजा रोड भागातील आहेत. यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली. 

हेही वाचा - रोहयोत ठाण मांडलेल्या सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

११५ कोरोनामुक्त; १० कोरोनाग्रस्त 
बुधवारी चौघांना कोरोनामुक्त करून डिस्चार्ज दिल्यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त केलेल्यांची संख्या ११५ वर गेल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण १३१ कोरोनाग्रस्त आढळले असून, सहाजणांचा मृत्यू झाला आहे. आता केवळ दहाजण कोरोनाग्रस्त असून, त्यांच्यावर आठ जणांवर जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये तर एकावर पुणे व एकावर औरंगाबादला उपचार सुरू असल्याचे डॉ. थोरात म्हणाले. 

हेही वाचा - गेवराईत बोगस खतविक्री सुरूच, तब्बल साडेबारा लाखांचा साठा जप्त

आरोग्य क्षेत्रातील प्रत्येकाची चाचणी 
खासगी आणि शासकीय दवाखान्यांतील प्रत्येकाचा विविध लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे डॉक्टरांपासून, नर्स, शिपाई, तंत्रज्ञ अशा सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. अंबाजोगाईच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेची रोजची थ्रोट स्वॅब तपासणीची क्षमता २७० असली तरी सध्या १८० स्वॅब तपासले जाऊ शकतात. जिल्ह्यातील संशयित व कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांची संख्या अद्याप शंभराच्या घरात राहिलेली आहे. त्यामुळे रोज अशा लोकांसह आरोग्य क्षेत्रातील लोकांचे स्वॅब तपासले जाणार आहेत. विशेष म्हणजे खासगी दवाखान्यांतील लोकांचीही कोरोना तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. थोरात म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the new three, only ten corona are now in Beed district