अशी ही कहाणी...अनाथ रेखाच्या जीवनात उगवणार नवी पहाट

जगदीश कुलकर्णी
रविवार, 28 जून 2020

यमगरवाडी येथील वसतिगृहात रविवारी (ता.२८) आगळावेगळा विवाह सोहळा पार पडणार आहे. 

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : माता-पित्याचे छत्र लहानपणीच हरपल्यानंतर चार भावंडे पोरकी झाली. किनवट (जि. नांदेड) येथे ती रस्त्यावर फिरताना दिसली. त्यांची केविलवाणी स्थिती काहींनी जाणली. सुमारे वीस वर्षांपूर्वी त्यांना यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील एकलव्य वसतिगृहात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे संगोपन, शिक्षण सुरू आहे. एवढेच नव्हे, तर त्यातील मोठी, नोकरी करीत असलेल्या रेखाच्या जीवनात रविवारी (ता. २८) आणखी एक नवी पहाट उगवणार आहे. ती विवाहबद्ध होणार आहे...

अंबाडी (ता. किनवट) येथील रेखा महादू चव्हाण (वय सात), तिची बहीण शीतल (सहा), भाऊ अर्जुन (चार) व रामू (सहा महिने) ही भावंडे रस्त्यावर फिरत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक गिरीश कुबेर यांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर या भावंडांना २००० मध्ये यमगरवाडी येथील एकलव्य वसतिगृहात आणण्यात आले. रामू सातत्याने गंभीर आजारी असायचा.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय शहापूरकर यांनी त्याच्यावर उपचार केले. वसतिगृहात चौघा अनाथ भावंडांची निवास, भोजनासह सर्व देखभाल करण्यात आली. मुलींच्या वसतिगृहाच्या सुजाता गणवीर यांनी त्यांचे संगोपन केले. दहावीनंतर रेखाने परिचारिका होण्याचे ठरविले. त्यासाठी ठाणे येथील वात्सल्य ट्रस्टने खर्च केला. 

आता ती मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पाच वर्षांपासून परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिची बहीण शीतल डीएमएलटीचे शिक्षण घेऊन मुंबई येथे नोकरी करीत आहे. अर्जुन नाशिक येथे बीएएमएस करीत आहे. रामूने लातूरच्या जनकल्याण समितीत दहावीची परीक्षा दिली आहे.

‘एमएसडब्ल्यू’ झालेल्या बालाजी मरडे याच्याशी रेखा रविवारी (ता. २८) दुपारी सव्वादोनला विवाहबद्ध होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य विवाहांची चर्चा होते. हा सोहळा मात्र आगळावेगळा आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनातील नियम पाळून ५० लोकांच्या उपस्थितीत यमगरवाडी येथील वसतिगृहातच होणाऱ्या या सोहळ्याला भाजपचे राज्य संघटन मंत्री विजय पुराणिक, भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या माजी अध्यक्ष सुवर्णा रावळ, वैजिनाथअप्पा लातुरे, डॉ. अभय शहापूरकर, वनवासी कल्याण आश्रमाचे सदस्य रावसाहेब कुलकर्णी, भटके विमुक्त प्रतिष्ठानचे कार्यवाह नरसिंह झरे, कार्यवाह विवेक अयाचित, उपाध्यक्ष विजयकुमार वाघमारे, महादेव गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. 

सात वर्षांची असताना हरपले माता-पित्याचे छत्र
अवघ्या सात वर्षांची असताना रेखाचे माता-पित्याचे छत्र हरपले. त्यावेळी सात महिने वय असलेल्या रामूने आता दहावीची परीक्षा दिली आहे. खडतर परिस्थितीशी झगडून उभ्या राहिलेल्या रेखाच्या नव्या आयुष्याला आता सुरवात होणार आहे. 

अशी ही कहाणी... 
- आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले 
- चार भावंडे रस्त्यावर फिरताना दिसली 
- यमगरवाडीच्या वसतिगृहाने दिला आधार 
- आता दोघी नोकरीला, दोन भाऊ शिकताहेत 

गिरीश कुबेर यांच्या सूचनेनुसार रमाकांत पवार यांनी रेखासह तिच्या चार भावंडांना यमगरवाडीतील वसतिगृहात आणले. त्यावेळी रेखा चव्हाण सात वर्षांची होती. वसतिगृहात चौघेही वाढले, शिकले. सामाजिकदृष्ट्या प्रगतीचा अंकुर उगवला आहे. 
- विजयकुमार वाघमारे, भटके विमुक्त प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, तुळजापूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Osmanabad