चालक-वाहकांना विश्रांतीऐवजी मिळतो मनस्ताप! 

अनिल जमधडे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • विश्रांतिगृहात ढेकूण, मच्छरांशी संघर्ष 
  • एसटी महामंडळाचे दुर्लक्ष 
  • सोयी सुविधा देण्याची मागणी 
  • शेकडो प्रवाशांच्या जीविताचा प्रश्‍न

औरंगाबाद: एसटीच्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या चालक-वाहकांना पुरेशी विश्रांती मिळणे दुरापास्त झाले आहे. महामंडळाच्या विश्रांतिगृहाची दुरवस्था त्याला कारणीभूत आहे. विश्रांतिगृहामध्ये ढेकूण, मच्छरांशी संषर्घ आणि मळक्‍या, तुटक्‍या गाद्या, दुर्गंधीयुक्त वातावरणात चालक व वाहकांना कशीबशी झोप काढावी लागत आहे. 

एसटी महामंडळ तिथे सारा गोंधळ अशी परिस्थिती कायमच आहे. एसटीच्या चालक व वाहकांना दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. दररोज शेकडो प्रवाशांची सुरक्षा ही चालकाच्या हातात असते. चालकाला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर अपघाताला निमंत्रण मिळू शकते, म्हणूनच एसटी महामंडळाच्या विश्रांतिगृहांमध्ये चालक व वाहकांना आवश्‍यक विश्रांती मिळावी म्हणून पुरेशा सोयीसुविधा देण्याची गरज आहे. अनावश्‍यक बाबींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या एसटीच्या अधिकाऱ्यांना मात्र चालक आणि वाहक हा घटक महत्त्वाचा वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर चालक आणि वाहकाला विश्रांती मिळण्याऐवजी मनस्ताप मिळत आहे.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक अशा दोन्ही आगारांमध्ये चालक-वाहकांच्या विश्रांतिगृहाची देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या गाद्या बदलण्यात आलेल्या नाहीत. वर्षानुवर्षांपासूनच्या गाद्यांमधून दुर्गंधी येत आहे. बेडशीट आणि उशी हा प्रकारच अस्तित्वात राहिलेला नाही. पलंग मोडकळीस आलेले आहेत. त्यातच चालक-वाहकांची संख्या अधिक आणि व्यवस्था कमी असल्याने विश्रांतीची व्यवस्था होईलच याची खात्री नसते. अनेक चालक-वाहकांना एसटी बसमध्येच झोपावे लागत आहे. मुळात ढेकूण, मच्छर, कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी पेस्ट कंट्रोल करणे आवश्‍यक आहे; मात्र विश्रांतिगृहाच्या स्थापनेपासून कधी पेस्ट कंट्रोल केल्याचे कुणीही सांगू शकत नाही. विश्रामगृहाचे छत अनेक ठिकाणी मोडकळीस आले आहे. अनेक पंखे बंद पडलेले असल्याने गर्मीत घामाघूम व्हावे लागते. 

हेही वाचा : नकोशीला मिळाला आधार.... 

स्वत:चेच अंथरुण-पांघरुण 
सिडको बसस्थानकात तर विश्रांतिगृहासाठी केवळ एकच हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. या ठिकाणी पलंग टाकलेले नाहीत किंवा गाद्याही नाहीत. चालक-वाहकांना स्वत:च अंथरुण-पांघरुण आणावे लागते. थेट फरशीवर बेडशीट टाकून विश्रांती घ्यावी लागत आहे. या ठिकाणी पलंगाची सोय नसल्याने चालक-वाहक बसमध्येच रात्र काढतात. कशीबशी रात्र काढल्यानंतर दिवस निघताच बसच्या वेळेवर ड्युटीवर निघून जावे लागते. त्यामुळे शेकडो प्रवाशांची सुरक्षा असलेल्या चालकांच्या आणि सोबतच वाहकांच्या आरोग्याचेही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

येथे क्‍लिक करा : नांदेड पोलिसांना दणका 

शुद्ध पाण्याचा अभाव 

मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी आहे; मात्र अनेक दिवस ही पाण्याची टाकी स्वच्छ केली जात नाही, असे चालक-वाहकांचे म्हणणे आहे. स्वच्छ पाणी मिळत नसल्याने पाण्याची बाटली विकत घ्यावी लागत आहे. विकत पाणी घेणे प्रत्येकाला परवडणारे नाही. त्यामुळे दररोज पाण्याची टाकी स्वच्छ करून, किमान शुद्ध पाण्याची सोय करावी, अशी मागणी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about st bus