क्या बात है ! दवाखान्याची पायरी न चढता ९० जणांनी घरी बसून केली कोरोनावर मात

corona free.jpg
corona free.jpg

लातूर : कोवीड केअर सेंटर किंवा रूग्णालयात जाऊन कोरोनावरील उपचार घेण्यापेक्षा स्वतःच्या घरी राहूनच होम आयसोलेशनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लातूरकर पुढे येत आहेत. यातूनच गृह विलगीकरणाची अर्थात होम आयसोलेशनची यशस्वी उपचार पद्धत विकसित झाली असून गेल्या ४७ दिवसात जिल्ह्यात तब्बल ४६५ रूग्णांनी या पद्धतीचे अनुकरण केले आहे.

यामुळेच दवाखान्याची पायरी न चढता तब्बल ९० जणांनी घरूनच कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तीचा हा नवा फंडा जिल्ह्यात चांगलाच फार्मात असून तो आरोग्य यंत्रणेवरील भार हलका करणारा ठरत आहे.

गृह विलगीकरणाचे निकष
सरकारने पाच जुलैपासून गृह विलगीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार अतिसौम्य तसेच लक्षणे नसलेल्यांना घरी राहूनच कोरोनाचे उपचार घेणे शक्य झाले. गृह विलगीकरणासाठी घरी स्वतंत्र खोली व टॉयलेट बाथरूमची आवश्यकता असून तसे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेने द्यावे लागते. रूग्णाची चोवीस तास काळजी घेणारी व्यक्ती व फोनवर तातडीने उपलब्ध होणाऱ्या डॉक्टरांची गरज आहे. डॉक्टरांकडून तसे पत्र घ्यावे लागते. या कागदपत्रानंतर रूग्णाने आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे, मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे तसेच गरज पडल्यास रूग्णालयात दाखल होण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यास जवळच्या कोवीड केअर सेंटरकडून रूग्णाला गृह विलगीकरणासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते.

यांना गृह विलगीकरण नाही
सर्वांनाच गृह विलगीकरणासाठ परवानगी मिळत नाही. साठ वर्षावरील तसेच हायपर टेन्शन, मधुमेह, किडणी, ह्रदयविकार, फुफ्फुस, मुत्रपिंड, यकृताचे जुनाट आजार, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले एचआयव्ही रूग्ण तसेच कर्करोग असलेले व अवयव प्रत्यारोपण केलेल्यांना सुविधा असल्यातरी गृह विलगीकणाची परवानगी दिली जात नाही.

गोळ्या आणि व्हिटॅमीनचे उपचार
गृह विलगीकरणातील १५ वर्षापुढील रूग्णाला व्हिटॅमीन सी व डी तसेच झिंक गोळ्या दिल्या जातात. ताप, सर्दी व खोकला असेल तर त्यानुसार गोळ्या दिल्या जातात. पूर्वी हायड्रोक्लोसीड कोरोफीनच्याही गोळ्या दिल्या जात होत्या. नवीन प्रोटोकॉलमध्ये कोरोफीनच्या गोळ्या बंद करण्यात आल्या आहेत. रूग्णाच्या संपर्कातील निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना या गोळ्या दिल्या जातात. १५ वर्षापेक्षा कमी वयाच्या रूग्णांना केवळ व्हिटॅमीनच्या गोळ्या दिल्या जातात. यात दहा दिवस उपचार आणि त्यानंतर सात दिवस होम क्वारंटाईन केले जाते. गृह विलगीकरणात असताना ताप आल्यानंतर त्या दिवसापासून पुढे दहा दिवस विलगीकरणाचा कालावधी मोजला जात असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले. 

पहिल्यांदा तीन बालकांची मात
जिल्ह्यात गृह विलगीकरणातून पहिल्यांदा उदगीरच्या रेड्डी कॉलनीतील तीन बालकांनी कोरोनावर मात केली आहे. यात चार, १३ व १७ वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. दहा जुलै रोजी हे सर्वजण गृह विलगीकरणात गेले. २० जुलै रोजी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना आणखी सात दिवस म्हणजे २७ जुलैपर्यंत गृह अलगीकरणात (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले. त्यानंतर तिघे कोरोनामुक्त झाल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले.

९० जण घरूनच कोरोनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार ९१० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ४६५ रूग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. त्यापैकी ९० रूग्णांनी घरी राहूनच कोरोनावर मात केली आहे. सध्या ३७५ रूग्ण सध्या गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली स्वतः  जागरूक राहून काळजी घेत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांच्या तुलनेत गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण सात टक्के असून अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ते सर्वाधिक असल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले.
  
(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com