esakal | Gram Panchayat Elections: आता लक्ष ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे, कार्यकर्त्यांच्या लागल्या पैजा
sakal

बोलून बातमी शोधा

Gram panchayat election

केंद्र सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेला (ग्रामपंचायत) मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Gram Panchayat Elections: आता लक्ष ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे, कार्यकर्त्यांच्या लागल्या पैजा

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतदान शुक्रवारी (ता.१५) झाले आहे. सोमवारी (ता.१८) मतमोजणी होणार असल्यामुळे गावातील कार्यकर्त्यांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. आपलेच पॕनल निवडूण येणार म्हणून पैजा लावल्या जात असल्या तरी ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.


केंद्र सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेला (ग्रामपंचायत) मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. विकास कामासाठी केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत आहे. त्यामुळे या संस्था आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी गावातील पुढाऱ्यांकडून तयारी केली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असले तरी सरपंच पद आरक्षणाचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले असून मोठ्या गावात चुरस पाहावयास मिळाली.

अनेक दिग्गज निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामध्ये नणंद, माळेगाव-जे, कोकळगाव, उस्तुरी, माळेगाव क, टाकळी, केळगाव, हाडगा, ताजपुर, गौर, सावरी,  होसुर, शिरोळ, तगरखेडा, शिऊर, कासार शिरशी, लांबोटा, सरवडी, बडूर, औराद शहाजानी, जाजणूर, मुदगड-एकोजी, हासोरी-बु, कासारबालकुंदा आदी गावात मोठी चुरस पाहावयास मिळाली.

त्यामुळे कार्यकर्त्यांचे लक्ष आता निकालाकडे लागले असून गावातील कार्यकर्त्यांकडून आपलेच पॕनल निवडूण येणार म्हणून पैजा लावल्या जात आहेत. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी (ता.१८ ) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार असून १८ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय फेरिनिहाय निकाल जाहीर होणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली. शिवाय येथे पास शिवाय प्रवेश दिला जाणार नाही असेही कळवण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर