Corona Breaking : लातूरात कोरोना बाधितांवर आता घरीच मिळणार उपचार 

सुशांत सांगवे 
शनिवार, 27 जून 2020


- लक्षणे नसलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय 
- निकषात बसणाऱ्या रुग्णांनाच ही सुविधा 

लातूर : सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत; परंतु तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्याची परवानगी मिळू शकणार आहे.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच लातुरातही आता कोरोनाबाधितांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे; पण ही सुविधा कोरोनाबाधित सर्व रुग्णांसाठी नाही, तर लक्षणे नाही; पण अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनाच मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या निकषांत बसणाऱ्या रुग्णांनाच घरात राहून उपचार घेता येणार आहेत. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

लातुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या सध्या तीनशेच्या जवळपास पोचली आहे. त्यातील १९० रुग्ण आजवर बरे झाले आहेत, तर १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांवर तातडीने आणि योग्य उपचार व्हावेत म्हणून शहरात आणि वेगवेगळ्या तालुक्यात यंत्रणा उभी करण्यात आली आहे. संशयित आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरही सुरू करण्यात आले होते; मात्र आता लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधित रुग्ण घरी राहून उपचार घेत आहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे म्हणाले, की आरोग्य मंत्रालय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि कोरोनासंबंधातील इतर कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत; पण त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशा रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जाणार आहेत. घरात रुग्णांसाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र बाथरूम असावे. यासह सरकारने दिलेल्या अन्य निकषांत बसणाऱ्या रुग्णांनाच घरी राहून उपचार घेता येणार आहेत. घरी राहून उपचार घेणे हे ऐच्छिक असणार आहे. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

घरी राहून उपचार घेताना कुठलाही त्रास जाणवला, तर तातडीने डॉक्टरांना दूरध्वनी करून सल्ला घ्यावा, अशा सूचना आम्ही संबंधित रुग्णांना देत आहोत. त्यासाठी आवश्यक दूरध्वनी क्रमांक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले जात आहेत. शिवाय, डॉक्टरही दररोज संबंधित रुग्णांना दूरध्वनी करून रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

 

 

घरी राहून उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाने घरातील इतर व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवणे, चेहऱ्याला मास्क बांधणे, नेमून दिलेल्या कालावधीपर्यंत स्वतंत्र खोलीत राहणे, दिलेली औषधे वेळेवर घेणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे, वैद्यकीय पथकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना संबंधित रुग्णांना देत आहोत. 
डॉ. संजय ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now latur city corona patient treatment in home