जालना : शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी शाळांना ‘दैनिक अहवाल’ भरावा लागणार ऑनलाइन

सुहास सदाव्रते
Wednesday, 25 November 2020

जालना  जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची व विद्यार्थ्यांची दररोज माहिती घेण्यासाठी आता शाळांना 'दैनिक अहवाल' ऑनलाइन माहिती भरावी लागणार आहे.

जालना :  जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची व विद्यार्थ्यांची दररोज माहिती घेण्यासाठी आता शाळांना 'दैनिक अहवाल' ऑनलाइन माहिती भरावी लागणार आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीत शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. यातच ता.२३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी नऊ शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तीन दिवसात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक शिक्षकांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. शिक्षक पॉझिटिव्हचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील किती शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरुवात झाली. यासह किती शिक्षक पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह अहवाल आले आहेत. याची आता दररोज ऑनलाइन माहिती घेतली जात आहे. शिक्षण विभागाने सदर माहिती भरण्यासाठी विशेष लिंक तयार केली आहे. जिल्ह्यातील शाळांनी दररोज 'दैनिक शाळा अहवाल" ऑनलाइन भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज दुपारी एक वाजेपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन माहिती भरावी लागणार आहे. सदर ऑनलाइन माहितीत शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, युडायस क्रमांक, विद्यार्थी पटसंख्या, शिक्षक संख्येसह किती पॉझिटिव्ह व निगेटिव्ह संख्या भरावी लागणार आहे.

शालेय मुलांची थर्मल गन, ऑक्सिमीटरसह तपासणी केली याची माहिती भरावी लागणार आहे. विद्यार्थ्यासाठी हात धुणे यासह शाळा निर्जंतुकीकरण केले आहे काय आदी विविध माहिती दररोज भरावी लागणार आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी (ता.२४ ) जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात १० हजार २२८ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जालना तालुक्यात २ हजार ९१५, बदनापूर ५२९, अंबड ७०४, घनसावंगी ६२८, परतूर ६९१, मंठा ३९३, भोकरदन ३ हजार २२३ तर जाफराबाद तालुक्यातील विविध शाळेत १ हजार १४१ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती ऑनलाइन मागविण्यात येत आहे. दैनिक शाळा अहवाल  भरणे बंधनकारक आहे. यामुळे किती शिक्षक पॉझिटिव्ह व निगेटिव्ह आहेत निश्चित संख्या कळणार आहे. दररोज किती विद्यार्थी आले याचीही माहिती मिळेल.
- आशा गरुड, शिक्षणाधिकारी, जालना

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Schools To Be Fill Up Teachers And Students Information Online Way Jalna News