वैद्यकीय तपासणीच्या पथकास अडथळा, कशामुळे ते वाचा...

corona
corona

पाथरी ः तालुक्यातील झरी येथे बाहेरगावांहून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यास गेलेल्या पथकास आमची वारंवार वैद्यकीय तपासणी करण्यास का येत आहे, या कारणावरून शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी घडली. दरम्यान, या प्रकरणी येथील सरपंच सुनीता खरात यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोग्य विभागाचे पथकातील डॉ. ए. बी. राजूरकर, मकरंद कुलकर्णी, डी. डी. पवार, अंगणवाडी कार्यकर्ती सुमन मुळे, महानंदा सत्वधर, पोलिस पाटील बाळासाहेब सत्वधर, आशा वर्कर मीरा सत्वधर आणि गावातील इतर कर्मचारी बाहेरगावांहून आलेल्या एकाची माहिती नोंद आणि तपासणी करण्यासाठी झरी गावातील वस्सा वाड्यासमोर गेले असताना गावातील रमेश गोविंद शिंदे त्या ठिकाणी आला. तुम्ही आरोग्य तपासणीसाठी वारंवार का येतात म्हणून आरोग्य तपासनीस त्याने अडथळा केल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, सरपंच सुनीता खरात यांनी या प्रकरणी पाथरी पोलिसात तक्रार दिली. 

मास्क न वापरणाऱ्यावर मानवतला गुन्हा
मानवत ः संचारबंदी असताना सुरक्षिततेसाठी मास्क न वापरता अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्या एका दुचाकी स्वारावर मानवत पोलिस स्टेशनला गुरुवारी (ता.नऊ) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांनी याबाबत फिर्याद दिली. महमद रफिक म. इब्राहिम (वय ४०, रा.पेठ मोहल्ला, मानवत) यांनी शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सुरक्षिततेसाठी तोंडाला कोणत्याही स्वरूपाचे मास्क लावले नव्हते. शिवाय त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मोटारसायकल क्रं. (एमएच- २२ एजे १९४०) घेऊन कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय फिरताना आढळून आले. 

पूर्णा तालुक्यातील ३८ जण होम कॉरंन्टाइन
पूर्णा ः येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार (ता.नऊ) पर्यंत एकूण सात संशयित रुग्ण विलिगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. त्यात एक मुलगा, चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरासह तालुक्यातील ३८ जणांना होम कॉरंन्टाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत. मुलीकडे जाऊन मुंबई येथून शहरात परतलेल्या ५५ वर्षीय महिलेला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने बुधवारी (ता.आठ) तसेच सोन्ना (ता.पूर्णा) येथील एका मुलीचा नुकताच ताप सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबातील १८ वर्षीय मुलगी, ४० वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगा व ५४ वर्षीय पुरुष हे सर्व खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:हून ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. या सर्वांची तपासणी करून त्यांची कॉरंन्टाइन कक्षात रवानगी केली. तालुक्यातील कावलगाव, एरंडेश्वर, कंठेश्वर, ताडकळस, धानोरा काळे या पाच आरोग्य केंद्र परिसरातील एकूण २८ जणांना होम कॉरंन्टाइन केले आहे. 

भिवंडी येथील चार व्यापाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह
मानवत ः चार दिवसांपूर्वी भिवंडी येथून शहरात शेळ्या खरेदी करण्यासाठी आलेल्या चार व्यापाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, या प्रकरणाने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांसह प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पोलिस प्रशासनाला भिवंडी येथील काही व्यापारी मानवत शहरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.सात) दुपारी साडेचार वाजता शहराजवळ एका खासगी वाहनातून भिवंडी येथील चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी केली असता शहरात शेळ्या खरेदी करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यांच्या रिपोर्ट गुरुवारी (ता.नऊ) प्राप्त झाला असून चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या चारही व्यापाऱ्यांना १४ दिवस शहरातील विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com