विमा कंपनीवर गुन्हा, ओरिएंटलला मुदत - धनंजय मुंडे 

दत्ता देशमुख
शनिवार, 18 जानेवारी 2020

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बै'ठकीपूर्वी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात दिरंगाई का केली जात आहे? याचा जाब विचारला. बजाज अलियांझ कंपनीने समाधानकारण उत्तर न दिल्याने या कंपनीवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश धनंजय मुंडेंनी दिले.

बीड - पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता. 18) जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. बैठकीपूर्वी बजाज अलियांझ व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मागच्या वर्षी विमा नाकारल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यामध्ये बजाजच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली कारणे पटण्याजोगी नसल्याने या कंपनीवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

ओरिएंटलने नाकारलेल्या 90 हजार शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांची पुन्हा फेरतपासणी करण्यासाठी 27 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. पात्र शेतकऱ्यांना विमा मिळेल, तर तर विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना नाकारण्याच्या कारणाचे लेखी पत्र दिले जाणार आहे. 

हेही वाचा - बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार, संजय दाैंड बिनविरोध

24 तासांत ट्रान्सफॉर्मर 
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना जळालेला ट्रान्सफार्मर 24 तासांत देण्यात येईल. तशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून या कामासाठी पाच कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर शेतात पोच झाला पाहिजे. त्यांच्याकडून पैसे वा कुठला खर्च होणार नाही, असेही मुंडे म्हणाले. 

हेही वाचा - ...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

खासदार मुंडेंची बैठकीकडे पाठ 
भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे शुक्रवारी जिल्ह्यात आल्या. गहिनीनाथगडावर कार्यक्रमानंतर बीडला जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली; परंतु त्या बैठकीला आल्या नाहीत. भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व नमिता मुंदडादेखील बैठकीला नव्हत्या. श्री. पवार विम्यासंदर्भात झालेल्या बैठकीला मात्र हजर होते. 

हेही वाचा - सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका

भाजपला असाही झटका 
झेडपीच्या जिल्हा नियोजन समितीने तयार केलेल्या आराखड्यापेक्षा अधिक निधी सरकारकडून मिळवून त्यापैकी 80 टक्के निधी पुढच्या डिसेंबरपर्यंत खर्च होईल, असा विश्वासही मुंडेंनी व्यक्त केला. नियोजन समितीच्या निधीतून हाती घेतलेल्या अनेक कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता व अनेक कामांचे प्रस्तावच आले नसल्याचे समोर आल्याचे सांगून या कामांना स्थगिती दिल्याचेही त्यांनी जाहीर केले. भाजपचा एक ठेकेदार व पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलीच चपराक दिली आहे. 

हेही वाचा - राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला

तुम्ही मोठ्या बापाच्या पोटी जन्मलात... 
बैठकीत भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यात "तू - तू - मै - मै' झाली. तुम्ही ज्येष्ठ नाहीत. आपण जिल्हा परिषद सदस्य, आमदार सोबतच झालो. दोघेही मंत्री होतो. फक्त फरक एवढाच की, तुम्ही मोठ्या बापाच्या पोटी जन्म घेतला आणि मी गरीब बापाच्या पोटी, असे बोल भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना सुनावले.

हेही वाचा - वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुलगी

त्यावर प्रकाश सोळंके यांनीही मी कोणाचा अपमान केला नाही, मी नियमाला धरून बोलत आहे. येथे कामाचे विषय बोला, असे प्रत्युत्तर दिले. दोघांतील शाब्दिक चकमक वाढत जात असतानाच बैठकीचे अध्यक्ष आणि राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करून दोघांना थांबविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offense on insurance company