विहीरीचे खोदकाम करताना मजूर ठार

आनंद इंदानी
Wednesday, 10 June 2020

ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक बोअर मशिनचा दांडा तुटला.  बोअर मशीनवर काम करणारे तीन मजूर विहिरीत पडले. त्यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

बदनापूर (जि.जालना) - ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक बोअर मशिनचा दांडा तुटला. या घटनेत बोअर मशीनवर काम करणारे तीन मजूर विहिरीत पडल्याने एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना बुधवारी (ता. दहा) पहाटे तालुक्यातील सायगाव - डोंगरगाव शिवारातील सुकना नदीच्या पात्रात घडली. अपघात मृत व जखमी झालेले मजूर छत्तीसगड राज्यातील होते. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

सायगाव - डोंगरगाव शिवारातील सुकना नदीच्या पात्रात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम सुरू आहे. या विहिरीत उभे - आडवे बोअर घेण्यासाठी बोअर मशीन आणण्यात आली होती. या ठिकाणी मंगळवारी (ता. नऊ) रात्री उशिरा विहिरीत बोअर घेतले जात होते.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

तेव्हा अचानक बोअर मशिनचा दांडा तुटल्याने काम करणारे तीन मजूर विहिरीत कोसळले. या अपघातात समरस ( वय ३० पूर्ण नाव माहीत नाही) हा जागेवरच ठार झाला. तर प्रकाश आणि रामनारायण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी जालना येथे रुग्णालयात हलविण्यात आले.  दरम्यान, या घटनेबाबत रामप्रसाद देवराव दसपुते (रा. भायगाव ता. अंबड) यांनी दिलेल्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. दहा) एकाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलिस मुख्य जमादार  खरात करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One labour killed while digging a well