लयी भारी जुगाड..! ट्रॅक्टरचे टायर काढून बैलगाडीची चाके लावली..अन शेतकऱ्यांसाठी बनवले 'हे' आधुनिक यंत्र..

traktar.jpg
traktar.jpg

उस्मानाबाद : कळंब शहरातील नवउद्योजक अशोक विठ्ठलराव काटे यांनी छोट्या ट्रॅक्टरला बैलगाडीची चाके जोडून आधुनिक पद्धतीचे कोळपे तसेच फवारणी यंत्र बनविले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शेतकरी वर्गातून कौतुक केले जात आहे.

शेतात बैलजोडीचा वापर आता कालबाह्य होत आहे. शिवाय बैल आणि बारदाना बाळगणे शेतकऱ्यांना जिकीरीचे ठरते. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवत कळंब शहरातील नवउद्योजक यांना एक कल्पना सुचली. 

सध्या बाजारात १८ एचपी ते २८ एचपीची छोटे ट्रॅक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र त्यांची उंची आणि चाके बघता सोयाबीनसारख्या पिकांमध्ये आंतरमशागतीसाठी वापर करता येत नाही. शिवाय अन्य मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करणेही अशक्य होते. त्यामुळे यावर काय उपायोजना करता येते का, याचा विचार काटे यांच्या मनात होता. त्यासाठी त्यांनी एका छोट्या ट्रॅक्टरचा वापर केला आहे.

ट्रॅक्टरला बैलगाडीची चाके
एका छोट्या ट्रॅक्टरची चारही चाकेही बाजूला काढली आहेत. ट्रॅक्टरचे वजनही मोठ्या प्रमाणात असते. त्या वजनाच्या क्षमतेचे बैलगाडीची चाके बनविली. शिवाय त्याला ॲक्सलही जोडला आहे. ट्रॅक्टरची सर्व चाके काढून त्या ठिकाणी बैलगाडीची चाके बसविली. त्यामुळे ट्रॅक्टरची क्षमता आहे तेव्हडी राहिली. दरम्यान बैलगाडीची चाके बसविल्याने ट्रॅक्टरची उंची वाढली. त्यामुळे पिकातील अंतरमशागतीसाठी याचा उपयोग होऊ लागला आहे.

अन्य अवजारे जोडली
या ट्रॅक्टरला कोळपणी यंत्र जोडले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये उगवून आल्यानंतर अगदी सहजच कोळपणी करता येते. शिवाय फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरी द्यावी लागत होती. तसेच पाणी वाहून न्यावे लागत होते. म्हणजेच मेहनत जास्त करावी लागत होती. मात्र या यंत्रणाने अगदी थोड्याच वेळात फवारणीची प्रक्रीया पूर्ण होते. तसेच पैसाही वाचतो. शिवाय कोळपणी करण्यासाठी बैलाची गरज लागत नाही.

शेतकरी वर्गातून कौतुक
सध्या शेतात मजुरांची टंचाई मोठया प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने शेती करावी, याकडे शेतकऱ्यांचाही कल वाढत आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असतो. मात्र या पिकात आंतरमशागत करता येईल, असे साधन उपलब्ध होत नव्हते. काटे यांनी स्वतःच्या बुद्धीमत्तेला कलेची जोड देत आधुनिक पद्धतीचे आंतर मशागतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या कार्यकुशलतेचे शेतकरी वर्गात कौतुक होत आहे.  

परवडण्याजोगी किंमत
सध्या हे यंत्र तयार करण्यासाठी ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र जेव्हा मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन होईल. तेव्हा याचा उत्पादन खर्च कमी होईल. शेतकऱ्यांना अगदी कमी दरामध्ये उपलब्ध होऊ शकते. शेतकरी या अवजाराची मोठ्या कुतुहलाने पाहणी करीत आहेत.

मीही एक शेतकरी आहे. शेतात मजुरांच्या टंचाईने शेतकरी परेशान होत आहेत. मजुरांअभावी अनेकांनी शेती करणे बंद केले आहे. पण, आधुनिक तंत्रज्ञान कसे तयार करता येईल, यावर मी सातत्याने विचार करीत होतो. त्यातूनच हा उपाय सुचला आहे. अनेक दिवसांपासून असे यंत्र बनविण्याचा माझा प्रयत्न होता. त्याला आता यश आले आहे.
अशोक काटे, नवउद्योजक, कळंब.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com