esakal | बससेवा सुरु झाली, मात्र प्रवासी मिळेना

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद : बसस्थानकावर उभी बस.

उस्मानाबाद जिल्ह्यात बससेवा सुरू झाली. शहरातील आगारांमध्ये रविवारपासून ही सेवा सुरू झाली. रविवारी, तसेच सोमवारी या दोन दिवसांत एकही प्रवासी मिळाला नसल्याने बस उभ्याच होत्या.

बससेवा सुरु झाली, मात्र प्रवासी मिळेना
sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोनाच्या संकटात एसटी महामंडळाच्या बसची चाके अडकली असल्याचे चित्र आहे. तब्बल दोन महिन्यानंतर बससेवा सुरु झाली आहे; मात्र प्रवासी आहेत का प्रवासी? असे म्हणत चालक-वाहकांना प्रवासी शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात महामंडळाच्या एसटी बस धावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण प्रवासी नसल्याने डिझेलचाही खर्च निघत नाही. 

कोरोनाच्या संकटाने अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईला आले आहे. त्यात एसटी महामंडळही सुटलेले दिसत नाही. शासनाने काही अटीवर जिल्ह्यांतर्गत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात बससेवा सुरू झाली.

हेही वाचा : पारंपरिक पदार्थांसह खवय्या मुलांची पोटपूजा जोरा

शहरातील आगारांमध्ये रविवारपासून ही सेवा सुरू झाली. रविवारी तसेच सोमवारी या दोन्ही दिवशी बस स्थानकावर गाड्या उभ्या होत्या. मात्र दोन्ही दिवस एकही प्रवासी मिळाला नाही. त्यामुळे आगारातून बसस्टॅन्ड आणि बसस्टँडमधून पुन्हा आगारात असाच एसटीचा प्रवास राहिला. मंगळवारी पुन्हा काही फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न आगारातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी केला. तेव्हा ढोकी, येरमाळा, तुळजापूर अशा मार्गावर बसेस धावल्या. 

प्रवाशांची संख्या 
मंगळवारी उस्मानाबाद आगारातून तेरला पहिली बसफेरी झाली. मात्र केवळ एकच प्रवासी होता. तर दुसरी फेरीत तीन प्रवासी होते. ढोकीला पहिल्या फेरीत एकच प्रवास होता. तर बामणीला जाताना एकही प्रवासी नव्हता. तर येताना तीन प्रवासी होते. दुसऱ्या फेरीत एकही प्रवासी नव्हता. लोहारा फेरीत जाताना एक तर येताना दोन प्रवासी होते. याशिवाय येरमाळ्याला गेलेल्या पहिल्या फेरीत जातानाही आणि येतानाही एकही प्रवासी मिळू शकला नाही. मात्र एसटी महामंडळाला टोल भरावा लागला. टोल भरणे एवढे उत्पन्न यामधून मिळाले नाही. 

का होतय असं? 
जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये एकदा बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. सकाळी सुरू झालेली बससेवा रात्री पुन्हा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. याशिवाय जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आदेश काढले जात आहेत. त्यामुळे महामंडळ या बससेवा केव्हा सुरू होईल आणि किंवा बंद होईल याची भिती प्रवाशांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे या बससेवेकडे प्रवासी फिरकायला तयार नाहीत. शिवाय वरिष्ठ स्तरावरूनही याबाबत ठोस आश्वासन दिले जात नाही. आता ही बससेवा जिल्ह्यांतर्गत केव्हा पूर्वपदावर येईल येईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 
 
तोटाच तोटा 
यापूर्वीही जिल्ह्यांतर्गत अथवा ग्रामीण भागात फिरणारी लालपरी मोठ्या प्रमाणावर तोट्यात होती. प्रवाशाअभावी अनेक फेऱ्या रिकाम्या जात होत्या. दहा ते पंधरा प्रवासीच प्रवास करायचे. त्यातही ज्येष्ठ नागरिकाची संख्या मोठी असायची. मात्र आता कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशच दिला जात नाही. तर ४४ क्षमता असलेल्या बसमधून केवळ पन्नास टक्केच प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आगार आता तोट्यातच आहे.

विशेष म्हणजे डिझेलसाठीही पदरमोड करावी लागत आहे. तेवढेही प्रवासी मिळत नसल्याने तोट्यात आणखीनच भर पडत असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कोरोनाचे संकट किती दिवस घोंगावणार अन्‌ महामंडळाच्या बसची या संकटात रुतलेली चाके केव्हा बाहेर पडणार? याची काळजी कर्मचारी वर्गालाही लागली आहे. त्यामुळे प्रवासी आहेत का प्रवासी? अशी म्हणण्याची वेळ या कर्मचाऱ्यावर येऊन ठेपली आहे.