उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक सक्तीच्या रजेवर..! का झाली कारवाई वाचा सविस्तर..

तानाजी जाधवर
Saturday, 1 August 2020

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना अखेर शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. जिल्ह्याचा मृत्युदर गेल्या काही दिवसापासून वाढत असल्याचाही फटका त्याना बसल्याचे बोलले जात आहे.

उस्मानाबाद : आपत्तीच्या काळात अनेक पातळीवर अपयशी ठरलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना अखेर शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. जिल्ह्याचा मृत्युदर गेल्या काही दिवसापासून वाढत असल्याचाही फटका त्याना बसल्याचे बोलले जात आहे. त्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे कारण दिले नसल्याने त्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

डॉ. राजाभाऊ गलांडे हे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात सुरुवातीला जिल्ह्यात अत्यंत चांगले नियोजन केल्याचे दिसुन आले होते. मात्र जशी-जशी कोरोनाची साथ वाढली तशी आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यात डॉ. गलांडे याना अनेक गोष्टीमध्ये दोषी धरण्यात येऊ लागले होते. थेट आरोग्यमंत्र्याकडे त्याच्याबद्दल तक्रारी गेल्याने त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सूरु झाली होती.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

यामध्ये मृत्युदर वाढणे, एका रुग्णाचा ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे मृत्यु झाला होता. शिवाय रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण होणे आदी गोष्टीबाबत स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी उस्मानाबादेत आल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्याच दिवशी डॉ. गलांडे यांच्यावर कारवाई होणार अशी चर्चा होती. त्यातही अनेक व्यवहारामध्ये अनियमितता आढळल्याचेही दिसुन आल्याची चर्चा होऊ लागली होती.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

फिल्डींग यशस्वी 
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून आरोग्यमंत्र्याकडे फिल्डींग लावल्याचेही चर्चा आहे. तेही कारण यासाठी महत्वाचे ठरल्याचे बोलले जात आहे. अन्यथा अशा काळामध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीकडे हा पदभार सोपविता आला असता मात्र डॉ. डि. के. पाटील यांचेच नाव आल्याने त्या चर्चेवरही शिक्कामोर्तब होत आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

आता नंबर कोणाचा ? 
जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनातील प्रमुखाची उचलबांगडी गेल्यानंतर आता अजून आणखी एकजणावर कारवाई होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनात अनेक गोष्टीमध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनाही बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार अशी चिन्हे निर्माण झाले आहेत. त्यांच्याबद्दलही अनेक तक्रारी मुख्यमंत्री व महसुल मंत्री यांच्याकडे गेल्या आहेत. त्यामुळे आता नंबर लागणार कोणाचा अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे.

संपादन- प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad District civil Surgeon compulsory leave