अधिक्षक अभियंत्याच्या अतिरिक्त पदभारात 'अर्थ' पुर्ण 'गौडबंगाल' : आ. सुजितसिंह ठाकूर    

सयाजी शेळके
Friday, 4 September 2020

  • उस्मानाबाद पाटबंधारे विभागातील अधिक्षक अभियंत्याचा अतिरिक्त पदभार नगरमधील कार्यकारी अभियंत्याकडे?
  • नियम मोडून, का आणि कोणी केला अट्टाहास? आ. सुजितसिंह ठाकूर यांनी साधला सत्ताधार्यांवर निशाना. 

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता हे पद रिक्त ठेवून मराठवाड्याच्या बाहेरील तीनशे किलोमीटर अंतरावरील अहमदनगर जिल्ह्यातील उर्ध्व प्रवरा धरण विभागाच्या (ता. संगमनेर) कार्यकारी अभियंत्याकडे अतिरिक्त कार्यभार नियमबाह्यपणे देण्याचा प्रताप सत्ताधारी नेत्यांनी केला आहे, असा आरोप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केला आहे. याबाबत संताप व्यक्त करून असे करण्याचा 'अर्थ' व यामागचे गौडबंगाल काय आहे? असा सवालही आमदार ठाकूर उपस्थित केला आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव  

याबाबत आमदार ठाकूर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उस्मानाबाद येथील पाटबंधारे मंडळास असलेले अधिक्षक अभियंता सुदर्शन पगार यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. यापूर्वी येथे अधिक्षक अभियंता म्हणून ए. बी अवलगावकर यांना पदस्थापना दिल्याचे आदेश काढले होते. त्यानंतर ए. बी अवलगावकर यांना येथे पदस्थापना न देता हे पद रिक्त ठेवण्यात आले. यापुढे जाऊन काही सत्ताधारी यांनी हस्तक्षेप केले आहे. चक्क औरंगाबाद मुख्य अभियंता यांच्या अंतर्गत नसलेल्या मराठवाड्याबाहेरील कार्यकारी अभियंता बी. आर. शिंगाडे यांना पदभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात सहा कार्यकारी अभियंते असतानाही असा प्रकार चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच होत आहे. याची अर्थपूर्ण चर्चा होत आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

मराठवाड्यातील विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यातील कायम दुष्काळी व अवर्षणप्रवण भागातील शेती सिंचनसाठी महत्त्वाकांक्षी असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ यांच्या कार्यालयातंर्गत येतो. हा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी तसेच अत्यंत जिव्हाळ्याचा असताना सत्ताधाऱ्यांनी इतकी उदासीन वृत्ती का दाखवली हा मोठाच प्रश्न असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा अनेक बाबींमुळे बर्‍याच वर्षापूर्वी जवळपास रद्दबातल ठरला होता. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प अतिंम टप्प्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ७ टीएमसी पाण्याला मान्यता मिळाली. निधीची कसलीच तरतूद नसलेल्या बोगद्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देऊन नीरा भीमा आणि जेऊर बोगद्यांची कामे गतीने सुरू केली. 

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या मात्र रद्दबातल ठरलेल्या प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यामुळेच पुनर्जीवीत केला. या आमच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्प बाबतीत या महाविकास आघाडी सरकारची आता तर उदासीनताच अधोरेखित झाली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असलेले उस्मानाबाद येथील अधिक्षक अभियंता हे महत्वपूर्ण पद रिक्त का ठेवले गेले? रिक्त ठेवलेच तर नियमानुसार विभागातील लगतच्या अधिक्षक अभियंत्याकडेच अतिरिक्त पदभार द्यायला हवा. का दिला नाही? याउपरही जिल्ह्यातील सहा कार्यकारी अभियंत्यांना डावलून मराठवाडा विभागाबाहेरील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील तीनशे कि. मी. दूर अंतरावरील कार्यकारी अभियंत्याकडे सर्व नियम मोडून अतिरिक्त पदभार देण्याचे नक्की प्रयोजन काय? कोणाचा आणि का अट्टाहास होता? या सर्व प्रश्नांची जिल्ह्यावासीयांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा आमदार ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Irrigation Department Superintendent Engineer news