esakal | धाराशिव साखर कारखाना उभारणार राज्यातील पहिला ऑक्सीजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट

बोलून बातमी शोधा

oxygen plant
राज्यातील पहिला ऑक्सीजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट उस्मानाबादमध्ये
sakal_logo
By
सुनिल पाटील

खामसवाडी (उस्मानाबाद): राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मित्तीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प चोराखळी (ता.कळंब) येथील धाराशिव साखर कारखान्यावर करण्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी (ता.२३) वसंतदादा इन्स्टिट्यूटने घेतलेल्या झूम मिटींगमध्ये राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची बैठक पार पडली यामध्ये धाराशिव शुगरचे अध्यक्ष अभिजीत पाटील सहभागी झाले होते. त्यानी हा पायलट प्रोजेक्ट होणार असल्याची माहिती दै.सकाळला दिली आहे.

सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोवीड रुग्णांना ऑक्सीजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असून ऑक्सीजनचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सर्व साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्मिती करण्याचे आवाहन केले होते. वाढत्या ऑक्सीजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सीजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा: दिलासादायक! लोहारातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सीजन निर्मिती तयारीस लागणाऱ्या परवानगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून हा पायलट प्रकल्प लवकर सूरु करण्यात यावा असे सांगितले आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येत आहे. धाराशिव साखर कारखाना प्रती दिन पंधरा टन ऑक्सीजन निर्मिती करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यास दररोज अठरा टन ऑक्सीजनची गरज भासते. ऑक्सीजन निर्मितीस लागणारी साधनसामग्री आठ दिवसांत कारखान्यात येणार असून मद्यार्क व इथेनॉल प्रकल्प तयार असून दहा ते पंधरा दिवसात ऑक्सीजन निर्मिती सुरू होईल असा विश्वासही त्यानी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: ‘तो’ फक्त खातो पोलिसांच्या हातची भाकरी!

राज्यातील हा पहिला ऑक्सीजन निर्मितीचा प्रयोग यशस्वी होऊन ऑक्सीजनचा होणारा तुटवडा कमी करण्यास मदत होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही या प्रयोगाबद्दल समाधान व्यक्त केले असून हा प्रकल्प सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.