esakal | लाल मातीचे आखाडे, तालमी ओस
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यात्रा, स्पर्धा बंद असल्याने राज्यातील कुस्तीगिरांना याची मोठी झळ बसली आहे. लाल मातीचे आखाडे, तालमी ओस पडल्या आहेत.

लाल मातीचे आखाडे, तालमी ओस

sakal_logo
By
प्रकाश काशीद

परंडा (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच यात्रा, जत्रा, उरूस, अन्य धार्मिक उत्सव, नियोजित कुस्ती स्पर्धा आदी उपक्रम बंद आहेत. इतर घटकांप्रमाणेच राज्यातील कुस्तीगिरांना याची मोठी झळ बसली आहे. लाल मातीचे आखाडे, तालमी ओस पडल्या आहेत.

लाल मातीतली, आखाड्यातील कुस्ती वैभवी परंपरेची वारसदार आहे. कुस्ती खेळात ताकदीला बुद्धीची जोड देत दोन मल्ल डाव-प्रतिडावाचे युद्ध करतात. ते पाहण्यासाठी मैदाने गर्दीने फुलतात. कुस्ती म्हटले, की सारे नजरेसमोर तरळते. दरवर्षी राज्यातील विविध भागांतील यात्रा, उरूस, विविध उत्सवांमध्ये कुस्ती हा महत्त्वाचा घटक मानला जातो.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कुस्तीगीर वर्षभर सराव करून मेहनत घेतात. आखाड्यात खेळाचे कौशल्य दाखवितात. त्यातून रोख बक्षिसे मिळवितात. बक्षिसाच्या रकमेतून पुढील वर्षभराच्या खुराकाचे, आहाराचे नियोजन करून आपली कला वाढविण्याच्या प्रयत्नात झोकून देतात.

कोरोनामुळे सर्वच यात्रा, उरूस, स्पर्धा आदींवर बंदी आहे. त्यामुळे कुस्ती मैदाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील कुस्तीगिरांवर आर्थिक संकट आले आहे. ग्रामीण भागातील अनेक पहिलवान कुस्तीकला शिकण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणांसह विविध नामांकित तालमीत प्रशिक्षण घेत आहेत. यासाठी मल्लांना मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. अशा पहिलवानांपुढेही खर्च भागविण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

जिल्ह्यातील अनेक मल्लांनी नावलौकिक मिळविला आहे. सध्याच्या परिस्थितीत निवडक, जिल्हा, राज्यपातळीवरील पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीगिरांसह होतकरू मल्लांना शासनाकडून आर्थिक पाठबळाची गरज आहे. या कामी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने लक्ष द्यावे. तसे झाल्यास राज्यातील कुस्तीकला टिकेल. 
- शिवाजी कदम, निवृत्त क्रीडा शिक्षक, परंडा 
ग्रामीण भागात आजही कुस्ती खेळ लोकप्रिय आहे. कोरोनामुळे यात्रा, स्पर्धा बंद असल्याने पडल्याने गरीब कुटुंबातील पदकविजेते पहिलवान मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. शासनस्तरावरून सहकार्य झाल्यास कुस्तीकलेची जोपासना होईल. 
- आप्पा काशीद, महाराष्ट्र चँपियन (वस्ताद) परंडा. 
अनेक गोरगरीब कुटुंबांतील पहिलवान कुस्ती क्षेत्रात आहेत. सहा महिने कुस्तीचा तालमीत सराव करून पुढील सहा महिने यात्रा, स्पर्धांत कमाई करून आपल्या खुराकाची सोय करतात. कोरोनामुळे सर्वच पहिलवान घरी बसून आहेत. शासनासह राज्य कुस्तीगीर परिषदेने राज्यपातळीवरील मल्लांना आर्थिक सहकार्य करावे. 
- हनुमंत पुरी, सुवर्णपदक विजेता मल्ल, कंडारी (ता. परंडा) 
ग्रामीण भागातील यात्रांतून चांगली कमाई करून पहिलवान कुस्तीचे प्रशिक्षण घेतात. कोरोनामुळे छोट्या-मोठ्या पहिलवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर होतकरू, जिल्हा, राज्यपातळीवरील मल्लांना आर्थिक सहकार्याची शासनाकडे मागणी करणार आहे. राज्यपातळीवरील मल्लांच्या दुप्पट मानधनवाढीसाठी राज्य कुस्तीगीर परिषदेकडे आग्रही राहणार आहे. 
- वामन गाते, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, उस्मानाबाद.